पुणे: सतरावर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका दाम्पत्यासह चौघांना अटक केली, तर दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नीसोबत बोलत असल्याच्या संशयातून या मुलाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो पळून जात होता. त्या वेळी त्याचा इतर आरोपींनी पाठलाग केला.
मंगळवारी (दि. २९) सकाळी साडेआठच्या सुमारास चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नदीपात्रात या मुलाचा मृतदेह मिळून आला होता. शिवकुमार बाबू वखरानी (वय १७ वर्षे ७ महिने, रा. ताडीवाला रस्ता, पुणे) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश रेड्डी, स्वाती रेड्डी, गौरव शिंदे, आशिष चाबुकस्वार या चौघांना अटक केली; तर आनंद रेड्डी, सूरज ऊर्फ चऱ्या मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवकुमार शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) रात्री दहा ते अकराच्या दरम्यान घरातून बेपत्ता झाला होता. मंगळवारी (दि. २९) सकाळी साडेआठच्या सुमारास चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळला होता.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आकाश रेड्डीला शिवकुमार हा आपल्या पत्नीसोबत बोलत असल्याचा संशय होता. त्यातूनच आकाश शनिवारी रात्री शिवकुमारला दुचाकीवरून बंडगार्डन बंधारा येथील बर्निंग घाट परिसरात घेऊन आला होता. या वेळी आकाशची पत्नी स्वाती देखील बरोबर होती. आकाशने शिवकुमारच्या कानशिलात लगावली.
त्यामुळे तो घाबरून पळून गेला. या वेळी इतर आरोपींनी त्याचा पाठलाग केला. पळून जात असताना शिवकुमार नदीपात्रात पडला की त्याच्यासोबत घातपात झाला, याचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली आहे.