पुणे: दै. ‘पुढारी’ आयोजित महाराष्ट्र कुस्तिगीर संघाच्या मान्यतेने आणि पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या सहकार्याने महिलांच्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त पुणेकर, क्रीडाप्रेमी, स्पर्धक, पालक ज्या स्पर्धेची वाट पाहत होते त्या पुढारी राइज अप पुणे महिला स्पर्धेचा चौथा हंगाम यावर्षी होत आहे. या हंगामामध्ये कुस्तीबरोबरच जलतरण, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, कबड्डी आणि बुद्धिबळ या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत.
या हंगामाची सुरुवात कुस्ती स्पर्धेने होणार असून, ही स्पर्धा रविवारी (दि. 11 जानेवारी) सकाळी 10 वाजता वारजेतील डुक्करखिंड येथील हिंदकेसरी आखाडा येथे होणार आहे. ही स्पर्धा 30 किलो, 35 किलो, 40 किलो, 45 किलो, 50 किलो, 55 किलो, 58 किलो, 62 किलो, 68 किलो आणि खुला गट 75 किलो अशा दहा वजनी गटांतील महिला कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील प्रथम चार विजेत्यांना रोख पारितोषिके, मेडल आणि सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहे.
या स्पर्धेला मुख्य प्रायोजकत्व माणिकचंद ऑक्सिरिच यांचे असून, फायनान्स पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, ॲकेडमिक पार्टनर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट यांचे आहेत. सह-प्रायोजक म्हणून अदानी, तर असोसिएटस पार्टनर म्हणून व्हॅलेन्टिना इंडस्ट्रीज यांचे सहकार्य मिळाले आहे. या स्पर्धेसाठी पुणे शहराबरोबरच पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड येथून अनेक महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.