शाळकरी हातांनी घडविले शाडू मातीचे ’गणराज’..! Pudhari
पुणे

Pudhari Majha Bappa: शाळकरी हातांनी घडविले शाडू मातीचे ’गणराज’..!

चाटे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणरक्षणाचा संदेश; राजीव गांधी ई-लर्निंगमधील विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शालेय गणवेशात मोठ्या उत्साहाने सकाळी-सकाळी शाळेत हजर राहत विद्यार्थ्यांनी शाळेच्या अभ्यासासोबतच शाडू मातीने पर्यावरणपूरक गणराजाची मूर्ती साकारली अन् पर्यावरणरक्षणाचा संदेश पुणेकरांना दिला.

निमित्त होते दैनिक ‘पुढारी’ आयोजित ‘माझा बाप्पा : शाडू मातीची मूर्ती, पर्यावरणाची स्फूर्ती’ या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत श्री गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे. शुक्रवारी (दि. 22) धनकवडी तळजाई येथील चाटे पब्लिक स्कूलमधील असंख्य विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत आपल्या हातांनी शाडू मातीने इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार केल्या. (Latest Pune News)

त्या वेळी विद्यार्थ्यांना भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्ट, भारती कला महाविद्यालय आणि भारती विद्यापीठ स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्टचे सुनील देशपांडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मार्गदर्शन केले.

राजीव गांधी ई-लर्निंगमधील विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

अभ्यासाची चिंता सोडून... शाडू मातीपासून बाप्पाची पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्यात दंग होऊन... चिमुकल्यांनी पर्यावरणरक्षणाचा निर्धार केला अन् गणपती बाप्पाचा जयघोष करीत कलाकृती साकारण्याचा आनंद लुटला.

दै. ‘पुढारी’च्या वतीने शिवदर्शनमधील राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ई-लर्निंग स्कूलमधील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी (दि. 22) पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी मुलांच्या चेहर्‍यावर अभ्यासाचा, होमवर्कचा कुठलाही ताण नव्हता, शाळा सुटण्याची किंवा घरी जाण्याची घाई नव्हती. सर्व चिमुकल्यांनी या उपक्रमामध्ये अतिशय आनंदाने सहभाग घेऊन ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडली.

दै. ‘पुढारी’च्या वतीने ‘माझा बाप्पा’ या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या कार्यशाळेतून श्रींची मूर्ती बनविण्याचा आनंद लुटला.

चाटे पब्लिक स्कूलमध्ये ’पुढारी न्यूज’ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या इको फ्रेंडली गणपतीमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी स्वतःहून पर्यावरणपूरक गणपतीमूर्ती घडविण्याचा अनुभव घेतला. आजच्या काळात प्रदूषणमुक्त व शाश्वत उत्सव साजरे करणे ही अत्यावश्यक बाब आहे. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचे महत्त्व पटले. शाळेच्या संचालक मंडळाच्या वतीने अशा उपक्रमाचे आयोजन करून समाजात पर्यावरणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी ’पुढारी न्यूज’चे मनःपूर्वक आभार. पुढील काळातही असे शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या उपयुक्त कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात यावेत.
- फुलचंद चाटे, संचालक, चाटे पब्लिक स्कूल चाटे पब्लिक स्कूलमध्ये
दै. ‘पुढारी’च्या सहकार्याने आयोजित इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात भाग घेतला आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्ती तयार करण्याची कला आत्मसात केली. आजच्या पिढीला प्रदूषणमुक्त आणि शाश्वत सण साजरा करण्याची प्रेरणा मिळणे, ही काळाची गरज आहे. या कार्यशाळेमुळे मुलांमध्ये पर्यावरणसंवर्धनाची जाणीव निर्माण झाली. भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, जबाबदारीची भावना आणि पर्यावरणाबद्दलची जपणूक विकसित व्हावी, हीच अपेक्षा आहे.
- रणजित जगताप, प्राचार्य, चाटे पब्लिक स्कूल
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी दै. ‘पुढारी’ने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा आयोजित केली आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आज पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. छोट्या-छोट्या गोष्टींतूनच पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. दै. ‘पुढारी’ने अतिशय उत्कृष्ट उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची दखल राज्य सरकार व केंद्र सरकारने घेऊन येथून पुढे पर्यावरणपूरक साहित्याचा जास्तीत वापर कसा करावा, याबाबत माहिती प्रसारित करावी.
- आबा बागूल, संस्थापक अध्यक्ष, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन, पुणे
पर्यावरणपूरक बाप्पांची मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेतल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल, यातून विद्यार्थ्यांचे कौशल्य व प्रयोगशीलता वाढेल. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गणेशोत्सवाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थ्यांनाही आनंद मिळत आहे. सामाजिक बांधिलकी पूर्ण होण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने जागरूक उपक्रम राबवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमाने पर्यावरणाचे संरक्षण तर होईलच; शिवाय जगाला वाचविण्याचा संदेश मिळेल.
- जाबुवंत मसलकर, मुख्याध्यापक, राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT