जंगली महाराज रस्ता येथे पायरेटेड पुस्तकांची विक्री करणारे स्टॉल. 
पुणे

प्रकाशन व्यवसायाला ‘पायरेटेड’ची वाळवी; मूळ प्रकाशकांचे हाल

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अनेक दिग्गज लेखकांच्या पुस्तकांची पायरेटेड पुस्तके (नकल प्रत) आताही सर्रासपणे विकली जात आहेत. या पायरसीविरोधात प्रकाशकांनी आवाज उठवूनही त्यासंदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने पायरेटेड पुस्तकांची विक्री अजूनही सुरूच आहे.
जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, कॅम्प, डेक्कन आदी परिसरात अशी पुस्तके विकणारे विक्रेते दिसून येत असून, यामुळे लेखक आणि प्रकाशकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याला कायमस्वरूपी लगाम लावण्यासाठी वाचकांनीच अशी पुस्तके विकत घेऊ नयेत, असे आवाहन प्रकाशक व लेखकांनी केले आहे.

सध्या पायरेटेड पुस्तकांबाबत प्रकाशकांनी तक्रार देऊनही अशा विक्रेत्यांवर कारवाई केली गेलेली नाही. आमच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशी पुस्तके विकणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी प्रकाशकांची मागणी आहे. दुसरीकडे, आता एक पाऊल पुढे जात प्रकाशकांनी नव्या पुस्तकांमध्ये 'पायरेटेड पुस्तकांची खरेदी-विक्री हा कायद्याने गुन्हा आहे आणि अशा गुन्ह्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते,' असा मजकूर टाकण्यास सुरुवात केली आहे.

तक्रार करूनही उपयोग नाही

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रेय पाष्टे म्हणाले, 'पायरेटेड पुस्तकांच्या विक्रीसंदर्भात पोलिसांकडे तक्रारही केली आहे. पण, त्याबाबत अजूनही काहीच झालेले नाही. कारण, पायरसी हा प्रश्न सहजासहजी सुटू शकणारा नाही. आताच्या घडीला हजारो पुस्तकांची पायरसी होते. त्यामुळे ते थांबविणे शक्य नाही. लोकजागृती मात्र होऊ शकते. अशी पुस्तके विकत न घेण्यासंदर्भात वाचकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे. वाचकांनी फक्त प्रकाशकांनी प्रकाशित केलेली मूळ पुस्तकेच विकत घेऊन वाचावीत.
वाचकांनीच पायरेटेड पुस्तके घेणे टाळावे. त्यातूनच पायरसी थांबू शकते. वाचकांनी पायरसीला प्रोत्साहन देऊ नये.'

मंजुळ प्रकाशनचे चेतन कोळी म्हणाले, 'जोपर्यंत पोलिस कारवाई करणार नाहीत तोपर्यंत पायरसी थांबणार नाही. प्रकाशक मोठ्या मेहनतीने पुस्तकांची निर्मिती करतात. हीच पुस्तके आज मुंबई, पुण्यासह राज्यभर ठिकठिकाणी पायरेटेड स्वरूपात विकली जात आहेत. हे थांबले पाहिजे, नाहीतर प्रकाशकांना पुढे पुस्तकांची निर्मिती करताना अनेक समस्या येतील. याबाबत सरकारने ठोस पावले उचलावीत.'
चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील म्हणाले, 'पायरेटेड पुस्तके खुलेआम विकली जातात. जुन्या पुस्तकांसह कॉपीराइट असलेली नवी पुस्तके विकली जात आहेत. अशा पायरेटेड पुस्तकांच्या विक्रीवर कोणाचेच नियंत्रण नाही.'

''पायरेटेड पुस्तकांसंदर्भात पोलिसांकडे वारंवार तक्रारही केली आहे. पण, त्याचे काही झाले नाही. म्हणूनच आता एक पाऊल पुढे जात पायरसी थांबावी, यासाठी गेल्या महिनाभरापासून आमच्या नवीन प्रकाशित होणार्‍या पुस्तकांमध्ये 'पायरेटेड पुस्तकांची खरेदी-विक्री हा कायद्याने गुन्हा आहे आणि अशा गुन्ह्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते,' असा मजकूर टाकण्यास सुरुवात केली आहे. पुस्तकांच्या आतील पानात हा मजकूर आम्ही टाकत असून, पायरसी थांबविण्यासाठी आणि वाचकांमध्ये जागृती करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे.''
                                                                                                                          – सुनील मेहता, मेहता पब्लिशिंग हाऊस

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT