पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात रात्री उशिरापर्यंत डीजेच्या कर्णकर्कश्श आवाजात मद्यधुंद रात्र जागविणारी पब संस्कृती झपाट्याने वाढीस लागली आहे. त्याचा नाहक त्रास स्थानिक रहिवाशांसोबत इतरांना सहन करावा लागतोय. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्त म्हणून पदभार घेताच, रेस्टॉरंट, बार, पबसंदर्भात एक नियमावली तयार केली होती. मात्र, कल्याणीगरमध्ये आयटी अभियंता तरुण-तरुणीच्या अपघाती मृत्यूनंतर रेस्टॉरंट, बार, पबचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गाडी चालवत असलेला मुलगा अल्पवयीन असतानादेखील त्याला पबमध्ये मद्य प्राशन करू देण्यात आल्याचे पुढे आले आहे. तसेच, वेळेच्या बाबतसुद्धा अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आलिशान पोर्शे गाडीने आयटी अभियंता अनिस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा या दोघांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये जखमी होऊन दोघांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भयानक होता की, कोस्टा ही दुचाकी काही फूट उंच उडून खाली पडली. कल्याणीनगर जंक्शन चौक येरवडा परिसरात ही घटना घडली. व्यावसायिकाचा मुलगा मुंढव्यातील एका पबमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी करून आला होता. बारावी पास झाल्यामुळे त्याने आपल्या मित्रांना पार्टी दिली होती. व्यावसायिकाचा मुलगा अल्पवयीन आहे.
तो अल्पवयीन असतानादेखील त्याला पबमध्ये कोणत्याही प्रकारची खात्री न करता मद्य पिण्यास देण्यात आले. नशेत तर्रर्र झाल्यानंतर त्याने आपल्या आलिशान गाडीने भरधाव वेगात धडक दिली. अनिस हा सॅटर्डे नाइटसाठी मैत्रिणीसोबत बाहेर पडला होता. पार्टीहून परतत असताना, त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. रात्री उशिरा हा प्रकार घडल्यामुळे पबमध्ये देण्यात आलेले मद्य, त्याचबरोबर वेळेचा प्रश्न असे अनेक मुद्दे पोलिस आयुक्तांच्या नियमावलींना हरताळ फासताना दिसून येत आहेत.
शहरात मध्यरात्रीनंतर हॉटेल, तसेच पब सुरू ठेवण्यात येत असून, आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली तयार केली होती. नियमावलीचे पालन न करता अटी व शर्तीचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणार्यांविरुद्ध कलम 144 नुसार कारवाईचे आदेश काढण्यात आले.
गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांकडून नियमित तपासणी. साउंडचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त नसावा. रहिवासी भागातील पब, हॉटेलचालकांनी सामान्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केल्यास पोलिस परवानगी घेणे गरजेचे आहे. शहरात काही इमारतींतील छतांवर (रूफ टॉप) हॉटेल सुरू केली आहेत. तेथे बेकायदा मद्यविक्री केली जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. बेकायदा मद्यविक्री करणे गुन्हा आहे. हॉटेल, पबचालकांनी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अंमलबजावणी करणे गरजेचे.
नियमभंग करणारे परमिट रूम, हॉटेल, पबचालकांना नोटीस. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास प्रसंगी गुन्हे दाखल.
मध्यरात्री दीडपर्यंत व्यवसायास परवानगी. रात्री दहानंतर मोठ्या आवाजात साउंडचा वापर केल्यास कारवाई. हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार किंवा डीजे येणार असल्यास त्याची माहिती देणे बंधनकारक. त्याची परवानगी पोलिसांकडून पंधरा दिवस अगोदर घ्यावी लागणार आहे. विदेशी कलाकर कधी येणार आहेत, कार्यक्रम संपवून ते कधी जाणार आहेत, त्यांच्या पासपोर्टच्या संदर्भातील सर्व माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे. एखादा इव्हेंट तुम्हाला शहरात आयोजित करायचा असेल, तर त्यासाठी दोन आठवडे अगोदर पोलिस आयुक्तालयातून परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी मिळाल्यानंतरच तुम्हाला कार्यक्रमाची तिकीट विक्री व प्रसिद्धी करता येणार आहे.
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हॉटेलचालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करणार्या मार्गावर, तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. प्रसाधनगृह वगळून हॉटेलमधील सर्व भागांत सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणातील रेकॉर्डिंग दोन डीव्हीआरमध्ये करावे लागणार आहे. पोलिसांनी एक डीव्हीआर यंत्र तपासणीसाठी नेले, तर दुसर्यामध्ये ते चित्रीकरण साठवले जाईल. हॉटेलमध्ये काम करणारे बाउंसर, कर्मचारी यांची चारित्र्यपडताळणी (पोलिस व्हेरफिकेशन) करणे बंधनकारक आहेत.
एखाद्या कर्मचार्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी संबंधित पोलिस उपायुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. अनेकदा बाउंसरकडून येणार्या ग्राहकांसोबत वादाचे प्रकार घडल्याची उदाहरणे आहेत. महिला ग्राहकांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. महिला सुरक्षारक्षक तेथे तैनात करण्याच्या सूचना, तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, बारमध्ये अठरा वर्षांखालील मुलांना मद्यविक्री करता येणार नाही. या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हॉटेलमध्ये धूम्रपानासाठी (स्मोकिंग झोन) असणे गरजेचे आहे. अन्य ठिकाणी धूम्रपान करता येणार नाही, अशा सूचनादेखील पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट- बार आणि पबमध्ये सर्व प्रकारचे हुक्का आणि शिशा विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा