पुणे: मुंबई महापालिकेकडून विले पार्ले येथील पाडण्यात आलेल्या जैन मंदिराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.22) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जैन धर्मीयांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या वेळी मुंबई महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात विद्यार्थी, युवक, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
विले पार्ले येथील 90 वर्षे जुने दिगंबर जैन मंदिर मुबंई महापालिकेच्या वतीने 16 एप्रिल रोजी अतिक्रमण असल्याचे सांगून तोडण्यात आले होते. याच्या निषेर्धात हा मोर्चा काढण्यात आला होता.
या वेळी अचल जैन, मिलिंद फडे, विजयकांत कोठारी, अॅड. अभय छाजेड, इंद्र छाजेड, बाळा ओसवाल, प्रवीण चोरबोले, युवराज शहा, अक्षय जैन, देवीचंद जैन, राजेश शहा, अजित पाटील, भरत सुराणा, नितीन जैन, बाळासाहेब धोका, अशोक पगारिया आदी उपस्थित होते.
अभय छाजेड म्हणाले, जैन समाज शांतताप्रिय आहे. आम्ही रस्त्यावर येणे ही गोष्टच दुर्मीळ आहे. पण, आजचे हे आंदोलन पूर्वनियोजित होते, कारण हे फक्त मुंबईपुरते मर्यादित नाही, तर पालिताना (गुजरात), सम्मेद शिखरजी आणि काही मंदिरांमध्येही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. शासनाने दोषींवर कारवाई करावी, ही आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
अचल जैन म्हणाले, ज्यांच्या श्रद्धास्थानांवर हात उठतो, त्यांच्या भावनांना धक्का पोहचतो. मंदिर पाडणे हा केवळ धार्मिक नव्हे, तर मानवी संवेदनांचा अवमान आहे. आम्ही शांततापूर्ण मार्गाने पण ठामपणे लढा देऊ. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
चारही प्रमुख संप्रदाय सदस्य उपस्थित
विशेष म्हणजे, या मोर्चावेळी जैन समाजातील दिगंबर, श्वेतांबर स्थानकवासी, मूर्तिपूजक आणि तेरापंथी हे चारही प्रमुख संप्रदाय सदस्य उपस्थित होते. हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले.