

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pahalgam Terror Attack | काश्मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बायसरण येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एअर इंडियाने आज (दि. २३) श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त विमानांची घोषणा केली.
एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, एअरलाइन बुधवार, २३ एप्रिल रोजी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त उड्डाणे चालवेल. एअर इंडियाने सांगितले की, बुधवारी श्रीनगरहून दिल्लीला सकाळी ११:३० वाजता आणि मुंबईला दुपारी १२:०० वाजता विमानसेवा सुरू होईल. इतर सर्व विमाने वेळापत्रकानुसार श्रीनगरहून निघतील. एअर इंडिया ३० एप्रिलपर्यंत या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत रीबुकिंग आणि रिफंड सुविधा देखील देणार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांच्याशी या घटनेची चर्चा केली. शिंदे यांच्या कार्यालयाने सांगितले की, त्यांनी नायडू यांच्याकडून मृतांचे मृतदेह श्रीनगरहून मुंबईत तात्काळ आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याची मागणी केली. सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील आणि मृतांचे मृतदेह लवकरात लवकर परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले.