पुणे

हिरडा नुकसानभरपाईसाठी तळेघर येथे धरणे

Laxman Dhenge

मंचर : पुढारी वृत्तसेवा : हिरडा नुकसानभरपाईचा निर्णय मंत्रिमंडळात त्वरित व्हावा, यासाठी तळेघर (ता. आंबेगाव) येथे धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. राज्य शासनाने मंत्रिमंडळात हिरडा नुकसानभरपाईचा निर्णय त्वरित घ्यावा; अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा किसान सभेचे जिल्हा सहसचिव अशोक पेकारी यांनी या वेळी दिला. हिरड्याला नुकसानभरपाई मिळावी म्हणून गेल्या 7 दिवसांपासून मंचर प्रांत कार्यालय येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणात डॉ. अमोल वाघमारे, भीमाबाई लोहकरे, कमलताई बांबळे, रोशन पेकारी, नारायण वायाळ आदी सहभागी झाले आहे.

या उपोषणाची दखल घेत जुन्नर येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हिरडा नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. परंतु मंत्रिमंडळात निर्णय झाल्याशिवाय हे उपोषण स्थगित केले जाणार नाही, असे आंदोलक डॉ. अमोल वाघमारे यांनी घोषित केले. मंत्रिमंडळाची लवकर बैठक व्हावी व या बैठकीत हा विषय मार्गी लागावा म्हणून तळेघर येथे शेकडो हिरडाउत्पादक शेतकरी यांनी एकत्रित येत जोरदार निदर्शने केली. यावेळी किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. नाथा शिंगाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय आढारी, तिरपाडचे सरपंच सोमा दाते, राजपूर सरपंच चंद्रकांत लोहकरे, चिखलीचे सरपंच जयराम जोशी, कोंढवळचे सरपंच दीपक चिमटे, तळेघरच्या सरपंच कविता इष्टे, शांताराम लोहकरे, का. बा. लोहकरे आदी उपस्थित होते.

हिरडा नुकसानभरपाई मिळणार : आढळराव पाटील

आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील आदिवासी भागातील हिरडा पिकाची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी येणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व मी स्वतः यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बुधवारी (दि. 21) सांगितले. दिलीप वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांनी दिलेल्या आश्वासनंतर किसान सभेच्या पदाधिकार्‍यांनी उपोषण स्थगित केले, त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात शिवाजीराव आढळराव पाटील बोलत होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT