विनयभंग करणारे तीन जण अखेर गजाआड : दौंड पोलिसांची कारवाई | पुढारी

विनयभंग करणारे तीन जण अखेर गजाआड : दौंड पोलिसांची कारवाई

दौंड : पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरात अल्पवयीन मुली तसेच महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढल्याने दौंड पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांत घडलेल्या विनयभंगासह पोस्कोच्या गुन्ह्यांतील पसार झालेल्या तीन आरोपींना दौंड पोलिसांनी अटक केली. राकेश ऊर्फ रोहित विजय गुळीग (रा. वडारगल्ली, दौंड), महेश दिलीप रंधवे (रा. मलठण, ता. दौंड) आणि लॉरेन्स विल्यम विश्वास (रा. वेताळनगर, दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश गुळीगविरोधात सोमवारी (दि. 19) छेडछाडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सन 2020 मध्ये महेश रंधवे याच्यावर छेडछाडीसह पोस्कोचा गुन्हा,तर दि. 6 जुलै 2023 रोजी लॉरेन्स विश्वास याच्याविरुद्धही छेडछाड व पोस्कोचा गुन्हा दाखल आहे. हे तिघेही गुन्हा घडल्यापासून पसार झाले होते. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याबाबत विशेष मोहीम राबवून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तिघांनाही अटक केली. यापैकी दोघांना 2 दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, शरद वारे, विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते आदींच्या पथकाने केली. पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे या अधिक तपास करीत आहेत. महिला व मुलींना त्रास देणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल. अशा घटना घडत असतील तर तत्काळ दौंड पोलिसांना कळवावे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक यादव यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button