महिलेच्या पोटातून काढला तब्बल 5 किलोचा ट्यूमर | पुढारी

महिलेच्या पोटातून काढला तब्बल 5 किलोचा ट्यूमर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सुमारे तीन महिन्यांपासून पोटात दुखते, गोळा आल्यासारखे वाटते, श्वास घेणेही कठीण वाटते, अशी तक्रार करणारी महिलेला पालिकेच्या व्ही. एन. देसाई सर्वसाधारण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिची तपासणी केल्यावर पोटात मोठा मांसल गोळा अर्थात ट्यूमर आढळला. रूग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने दुर्मिळ आणि अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करुन या महिलेच्या पोटातून तब्बल पाच किलो वजनाचा ट्यूमर काढला आणि असह्य वेदनांमधून तिची सुटका केली.

संबंधित बातम्या 

पोटाचा वाढता आकार, श्वास घेण्यास त्रास व दैनंदिन जीवनात अतिथकवा या तक्रारींमुळे 26 वर्षीय महिला कमालीची त्रस्त होती. त्यांच्या पोटात सतत दुखत होते. तसेच त्यांचे वजन असाधारणपणे वाढत होते. या महिलेचा दोन वेळा गर्भपात झाला होता. त्यानंतर यशस्वी गर्भधारणा व प्रसूती होवून बाळ झाले. त्यानंतर पोटदुखी होवू लागल्याने या महिलेने वेळोवेळी स्थानिक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. मात्र, त्रासापासुन सुटका झाली नाही.

वैद्यकीय तपासणीदरम्यान महिलेच्या ओटीपोटाजवळ अंदाजे 21 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर आकाराचा गोळा दिसत होता. एम. आर. आय. तपासणीत महिलेच्या पोटात उजव्या भागात एक गळू (सिस्ट) आढळून आला. त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘मुसिनस सिस्टऍडेनोमा’ म्हणतात. जगभरात बीजकोशाच्या गाठींपैकी केवळ 15 टक्के ‘मुसिनस सिस्टऍडेनोमा’ असतात. सिटी स्कॅन, सोनोग्राफी आदी अहवाल प्राप्त झाल्यानंतर, एकूणच स्थिती लक्षात घेता या महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. ललिता मायादेव, डॉ. श्वेता काशीकर, डॉ. डोलोमनी आणि डॉ. निकिता यांनी उपचार केले.

शस्त्रक्रिये दरम्यान महिलेच्या बीजकोशातून 24 सेटीमीटर बाय 23 सेंटीमीटर आकाराचा अनेक कप्पे असलेला मांसल गोळा अर्थात ट्यूमर काढण्यात आला. या ट्यूमरचे अंदाजे वजन 5 किलो एवढे होते. त्या अंतर्गत 2.5 लीटर ‘मुसिनस’ द्रव होते. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या वेदना दूर झाल्या. देसाई रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. ललिता मायादेव यांनी सांगितले की, पालिका सर्वसाधारण उपनगरीय रूग्णालयात सुरू करण्यात आलेल्या ‘डीएनबी’ अभ्यासक्रमामुळे व्ही. एन. देसाई रूग्णालयामध्ये अश आव्हानात्मक शस्त्रक्रिया करता आली.

Back to top button