पुणे: नाट्यगृहाच्या आत खाद्यपदार्थ नेण्यास मनाई, नाटक सुरू होण्यापूर्वी नाट्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून प्रेक्षकांनी नाट्यगृहामध्ये खाद्यपदार्थ आणू नये, असे आवाहन, प्रयोग सुरू होण्याआधी आणि संपल्यानंतर नाट्यगृहाची स्वच्छता आणि उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी सर्व नाट्यगृहांमध्ये पिंजरे लावणे, सर्व नाट्यगृहांमध्ये पेस कंट्रोल, नाट्यगृहांच्या स्वच्छतेसाठी वेळ मिळावा, यासाठी संयोजकांनी नियोजित वेळेत कार्यक्रम सुरू करावा आणि संपवावा, असे आवाहन... अशा विविध उपाययोजना महापालिकेच्या सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात येणार आहेत. मंगळवारी (दि. 3) झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी (दि. 31) रात्री नाटकाचा प्रयोग सुरू असताना एका महिला प्रेक्षकाला उंदराने चावा घेतला आणि गोंधळ उडाला. त्यामुळे महापालिकेच्या नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Latest Pune News)
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सांस्कृतिक विभागामार्फत विद्युत विभाग, भवन विभागासह नाट्य कलाकार आणि नाट्य व्यवस्थापकांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत पालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ, नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे, भवन आणि विद्युत विभागातील अधिकारी, नाट्य व्यवस्थापक मोहन कुलकर्णी, प्रवीण बर्वे, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजित धांडेकर, शिरीष रायरीकर हे सहभागी झाले.
बैठकीमध्ये कलाकार आणि नाट्य व्यवस्थापकांशी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासह पालिकेच्या इतर नाट्यगृहांमधील समस्या आणि त्यावरील उपाययोजना, याबद्दल चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर सांस्कृतिक विभागाकडून काही निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, बैठकीपूर्वी सुनील बल्लाळ, राजेश कामठे यांच्यासह विद्युत आणि भवन विभागातील अधिकार्यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची पाहणी केली.
याविषयी राजेश कामठे म्हणाले की, घटनेनंतर मंगळवारी बैठकीपूर्वी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची पाहणी करून येथील समस्यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत नाट्यगृहांमधील समस्या आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना, याबद्दल चर्चा झाली. चर्चेनंतर काही निर्णय घेतले आहेत.
माहिती घेऊन पावले उचलू
पत्रकार भवनमध्ये मंगळवारी (दि. 3) झालेल्या एका पत्रकार परिषदेला उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यांना यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या घटनेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी याविषयीची पूर्ण माहिती घेऊन पालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी चर्चा करून पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
घटनेची पालिकेच्या आयुक्तांनीही घेतली दखल
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात घडलेल्या घटनेची दखल पुणे महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनीही घेतली आहे. नाट्यगृहात झालेली गैरसोय गंभीर स्वरूपाची आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी तातडीने कार्यवाही केली जाणार आहे. त्याबाबतच्या सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत, असे राम यांनी सांगितले.
नाट्यगृहांंमध्ये वातानुकूलित यंत्रणा, विद्युत, पाणी आणि स्वच्छतेबाबतच्या अनेक समस्या आहेतच. त्यात उंदरांचा उपद्रवही वाढला आहे. अशा विविध समस्या आणि त्यावरील उपाय, याविषयी बैठकीत चर्चा झाली. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर निर्णयांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हायला हवी.- मोहन कुलकर्णी, नाट्य व्यवस्थापक