पुणे: शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका संगणक अभियंत्याची 3 कोटी 71 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाघोली येथील एका 53 वर्षीय व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च ते जून 2025 दरम्यान घडली आहे.
फिर्यादींना एका व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. या ग्रुपमधील सदस्य ग्रुप अॅडमिनने दिलेल्या सल्ल्यामुळे शेअर मार्केटमध्ये नफा मिळत असल्याचे सांगून त्याचे कौतुक करत होते. फिर्यादींनी मार्च महिन्यात ग्रुपवरील सर्व मेसेज वाचले आणि अॅडमिनशी संपर्क साधला. (Latest Pune News)
यानंतर फिर्यादींना एक लिंक पाठवून धानी सिक्युरिटी नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले गेले. फिर्यादींनी या अॅपच्या माध्यमातून कमी किमतीचे शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली.
मात्र, तुम्ही स्वस्त शेअर्स खरेदी केल्यास तुम्हाला फायदा होणार नाही, असे सांगत सायबर चोरट्यांनी फिर्यादींना महागडे शेअर्स विकत घेऊन गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यांनी फिर्यादींना त्यांच्या बँक खात्यावर पैसे पाठवल्यास चांगले शेअर्स विकत घेतले जातील, असे सांगितले आणि हा सर्व व्यवहार अॅपवर दिसेल असेही सांगितले.
या भूलथापांना बळी पडून फिर्यादींनी वेगवेगळ्या 19 बँक खात्यांवर एकूण 3 कोटी 71 लाख 25 हजार रुपये पाठवले. कोणताही लाभ न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणाचा पुढील पोलीस निरीक्षक निकम करीत आहेत.