

पुणे: राज्य सरकार, महामंडळ, राज्य आणि केंद्र सरकारच्या अनुदानित, विनाअनुदानित खासगी, अल्पसंख्याक दंत संस्थांमध्ये 2025- 26 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य कोट्यातील जागांसाठी पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया शनिवारपासून (दि.28 जून) सुरू झाली आहे.
इच्छुक उमेदवारांना https:/// cetcell. mahacet. org या अधिकृत वेबसाईटवर येत्या 3 जुलैपर्यंत नोंदणी करता येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. (Latest Pune News)
नीट एमडीएस- 2025 परीक्षेला बसलेल्या आणि महाराष्ट्र राज्यात असलेल्या राज्य सरकार, महामंडळ, राज्य आणि केंद्र सरकारच्या अनुदानित, विनाअनुदानित खासगी आणि अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमांच्या उपलब्ध जागांसाठी अर्ज करू इच्छिणार्या उमेदवारांनी सादर केलेली माहिती नीट- एमडीएस- 2025 महाराष्ट्र राज्य तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी वापरली जाईल.
ही माहिती सादर करणार्या आणि यशस्वीरीत्या पैसे भरणार्या सर्व इच्छुक उमेदवारांचा (एनआरआय उमेदवारांसह) फक्त महाराष्ट्र राज्यात असलेल्या उपलब्ध जागांवर प्रवेशाच्या पुढील प्रक्रियेसाठी विचार केला जाणार आहे.
उमेदवारांनी माहिती पुस्तिका वाचावी आणि अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता पडताळावी. अर्जात योग्य माहिती देणे ही उमेदवाराची एकमेव जबाबदारी आहे. उमेदवाराने भरलेली कोणतीही चुकीची माहिती प्रवेश रद्द करू शकते. उमेदवाराच्या पात्रतेची पडताळणी करण्यासाठी एनआरआय उमेदवाराने 2 जुलैपूर्वी नोंदणी करावी, असेही सीईटी सेलने सांगितले आहे.
...असे आहे वेळापत्रक
नीट एमडीएससाठी ऑनलाइन नोंदणी - 28 जून ते 3 जुलै
शुल्क भरणे तसेच कागदपत्रे अपलोड करणे - 28 जून ते 3 जुलै
सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे - 4 जुलै
पसंतीक्रम भरणे - 4 ते 7 जुलै
प्रथम फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करणे - 8 जुलै
संस्थांमध्ये जाऊन प्रवेश घेणे - 9 ते 13 जुलै