पुणे/वाघोली: वाघोलीतील बायफ रस्त्यावरील पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांच्याकडून रात्री प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे, परीक्षा झाल्यानंतर देखील रात्री परत तेच पेपर विद्यार्थ्यांना लिहण्यासाठी हा प्राध्यापक देत होता. त्यासाठी दहा ते पन्नास हजार रुपयांचा रेट ठेवण्यात आला होता. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-6 च्या पथकाला या टोळीची माहिती मिळाली अन् त्यांचा गैरप्रकार उजेडात आला. (Latest Pune News)
याप्रकरणी प्राध्यापकासह विद्यार्थ्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून इंजिनिरिंग मॅथेमॅटिक्स उत्तरपत्रिकेचे सहा बंडल, दोन लाख सहा हजार रुपये, उत्तरपत्रिका ठेवलेल्या कक्षाची चावी, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राध्यापक प्रतीक किसन सातव (वय 37, रा. प्रेमकुंज सोसायटी, केसनंद, वाघोली), आदित्य यशवंत खिलारे (वय 20, मूळ रा. रांजणीवळती, ता. आंबेगाव, जि. पुणे;सध्या रा. वाघोली), अमोल अशोक नागरगोजे (वय 19, मूळ रा. रोहतवाडी, पाटोदा; सध्या रा. वाघोली), अनिकेत शिवाजी रोडे (वय 20, मूळ रा. नान्नज, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर; सध्या रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिस शिपाई शेखर काटे यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 303 (2),318 (2), 318, (4), 61 (2), सह सार्वजनिक परीक्षा (आयोग साधनांचे प्रतिबंध) विधेयक 2024 चे कलम 4, 5, 10, 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वाघोलीतील बायफ रस्त्यावर असलेल्या पार्वतीबाई गेनबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रतीक सातव हा सोमवारी (दि. 2 जून) दुपारी झालेल्या अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षातील मॅथेमॅटिक्स-2 प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून रात्री सोडवून घेणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-6 मधील सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे यांना मिळाली.
प्रा. सातव याने त्यासाठी विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने रात्री छापा टाकला. त्या वेळी अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षातील आठ विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात येत असल्याचे आढळून आले.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने उत्तरपत्रिका ठेवलेल्या कक्षाची चावी त्यांच्याकडून जप्त केली. विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतलेल्या उत्तरपत्रिकांची सहा बंडले तसेच प्रा. सातव आणि साथीदारांकडून दोन लाख सहा हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर प्रा. सातव याच्यासह चौघांना अटक करण्यात आली.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, शेखर काटे, गणेश डोंगरे, ऋषी व्यवहारे, हृषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, कीर्ती मांदळे, प्रतीक्षा पानसरे यांनी ही कामगिरी केली.
नापास होण्याची धास्ती; विद्यार्थ्यांना हेरले
या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रा. प्रतीक सातव आणि साथीदारांनी ज्या विद्यार्थ्यांना मॅथेमॅटिक्स- 2 विषयात नापास होण्याची भीती वाट होती अशा विद्यार्थ्यांना हेरले. सातव आणि साथीदारांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 50 हजार रुपये घेतले. अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा कक्षाची (कंट्रोल रूम) बनावट चावी तयार करून घेतली.
या चावीचा वापर करून मॅथेमॅटिक्स- 2 विषयाच्या उत्तरपत्रिकांचे सहा सीलबंद बंडल काढून घेतले. विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका काढून घेतल्या. उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यासाठी दिल्या. या प्रकरणात अटक केलेला आरोपी आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे, अनिकेत रोडे हे अभियांत्रिकी शाखेत दुसर्या वर्षात शिक्षण घेत आहेत. नागरगोजे आणि खिलारे अभियांत्रिकी महाविद्यालयात रात्रपाळीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिली.
येत्या 7 दिवसांत समितीस सत्यशोधन अहवाल सादर करण्याचे निर्देश
मोझे अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली येथील प्राध्यापकाकडून जी कृती घडली, ती अत्यंत अनैतिक आणि विद्यापीठ परीक्षा नियोजन नियमावलीचे उल्लंघन करणारी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तत्काळ याबाबतीत सत्यशोधन समिती गठित केली असून, येत्या 7 दिवसांत या समितीस सत्यशोधन अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. देसाई म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ हे परीक्षा नियोजन, मूल्यनिर्धारण आणि परीक्षांचे निकाल सुव्यवस्थित करण्यासाठी कटिबद्ध असून, यासंदर्भातील प्रत्येक कृती ही अधिनियमित, प्रामाणिक, संवेदनशील तसेच ती नियमबद्ध व नैतिक असली पाहिजे. याबाबतीत जागरूक आहे.
परीक्षा नियोजन व मूल्यमापन तसेच निकाल प्रक्रियेशी संबंधित सर्व घटकांमध्ये याबाबतीत संवेदनशील आहे. त्यामुळे मोझे अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली येथील प्राध्यापकाने पेपरसंदर्भात जे अनैतिक कृत्य केले आहे, त्यासंदर्भात माहिती मिळताच तत्काळ सत्यशोधन समिती स्थापन केली आहे.
या समितीकडून अहवाल प्राप्त होताच तत्काळ परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून याबाबतीत संबंधितांवर विद्यापीठ कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची अशी घटना असून, तिचे गांभीर्य आणि पावित्र्य प्रत्येकाने जपायला हवे. याबाबतीत विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ अत्यंत संवेदनशील असल्याचे देखील डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले आहे.