बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या 'जैसे थे' आहे. बेशिस्त वाहनचालक आणि अपुर्या पार्किंगच्या व्यवस्थेमुळे बारामती शहरातील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. शहरातील भिगवण व तीन हत्ती चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. याशिवाय कसबा, इंदापूर चौक, गुणवडी चौक, भाजी मंडई परिसर, रिंग रोडवरील प्रमुख चौक, फलटण रस्ता, शिवाजी चौक, पंचायत समिती चौक, कोर्ट कॉर्नर, पेन्सिल चौक, सिनेमा रस्ता आदी भागांत वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतो.
वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता जड वाहने शहरातून प्रवास करतात. यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर वाहनचालकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पार्किंगसाठी शहरात कोणतीही व्यवस्था नसल्याने ज्याला जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने लावली जातात. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत उपाययोजना करण्याची गरज आहे.
बारामती नगरपरिषदेच्या इमारतीसमोरील मुख्य रस्ता सध्या वाहनतळ बनला आहे. मालवाहू वाहने, रिक्षा यांचा अनधिकृत थांबा येथे तयार झाला आहे. मालवाहू वाहने दिवसभर येथे लावलेली असतात. पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरील या वाहनांवरही कारवाई होताना दिसत नाही.
अवजड वाहने शहरात येऊ नयेत, ती रिंगरोडने बाहेर निघावीत अशी व्यवस्था बारामतीत करण्यात आली आहे. परंतु, कारवाईत सातत्य नसल्याने आता अवजड वाहने सर्रासपणे शहरातून ये-जा करत आहेत. मालवाहू अवजड वाहनांचाही त्यात समावेश आहे. ही वाहने वाहतूक कोंडीला व अपघातांना निमंत्रण देत आहेत.
हेही वाचा