Sunil Tatkare on Prithviraj Chavan
पुणे: काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात काँग्रेसला संपविण्याचे ऐतिहासिक काम केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.
बालेवाडीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन सोहळ्यात तटकरे बोलत होते. या वेळी ते म्हणाले, सचिनचा जसा कोणी रेकॉर्ड मोडू शकत नाही, तसे अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकत नाही. मात्र, आम्हाला तेवढ्यावर समाधानी न राहता तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे काम करायचे आहे. (Latest Pune News)
शरद पवार यांनी महिला धोरण आणले. सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाची कामे केली. विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात कृष्णेचे पाणी मराठवाड्याला नेण्याचे काम झाले, त्यावेळी अजित पवार हे जलसंपदा खात्याचे मंत्री होते.
त्या निर्णयाला विरोध झाला. मात्र, आज मराठवाड्यात जे हरितक्षेत्र आहे, ते या दोन नेत्यांमुळे आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पदावर आलेल्या सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण यांनी चांगले काम केले. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रेस संपविण्याचे काम केले. त्यामुळे काँग्रेस चौथ्या क्रमाकांवर गेल्याची टीका तटकरे यांनी केली.
पुढे ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही. तेव्हा अजित पवार यांच्यावर टीका झाली. पण मला विश्वास होता की, विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळणार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच आपल्याला यश मिळाले. आता चार महिन्यांवर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला मोठ्या ताकदीने सामोरे जायचे आहे. एक नवीन ऊर्जा घेऊन काम करायचे आहे. या निवडणुकांमध्ये महायुतीच्या धर्माला बाधा न आणता यश मिळवायचे आहे.