Supriya Sule: एका ताटात जेवलो हे विसरणार नाही; मात्र त्यांना शुभेच्छा; अजित पवारांचे नाव न घेता सुप्रिया सुळेंचा टोला

'पक्षवाढीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे'
Supriya Sule
एका ताटात जेवलो हे विसरणार नाही; मात्र त्यांना शुभेच्छा; अजित पवारांचे नाव न घेता सुप्रिया सुळेंचा टोलाPudhari
Published on
Updated on

पुणे: पक्षवाढीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. ज्यांनी कधी ना कधी आपल्यासोबत काम केलं आहे, त्याची जाणीव माणसाने आयुष्यात नेहमी ठेवली पाहिजे. त्यांच्यावर थेट टीका करत नसल्याचा आरोप केला जातो. मात्र, चार निवडणुकांपैकी तीनवेळा त्यांनी मला मदत केली आहे. एका निवडणुकीत त्यांनी विरोध केला.

त्यामुळे आम्ही एका ताटात जेवलो आहे, ते हे विसरले असतील. पण, माझ्यावर संस्कार आहेत, हे मी कधीही विसरणार नाही, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. तसेच, ज्यांनी ज्यांनी जो मार्ग निवडला आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. (Latest Pune News)

Supriya Sule
Pune Politics: जातनिहाय जनगणना काँग्रेसनेच टाळली; प्रफुल्ल पटेल यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार पक्ष) 26 व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, नीलेश लंके, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

खा. सुळे म्हणाल्या, आजही राष्ट्रवादी कोणाची, असे विचारले असता, ती शरद पवार यांची असेच सांगितले जाते. ही केवळ एक धारणा नसून वास्तव आहे. पक्षाची स्थापना आणि गेल्या 26 वर्षांचा प्रवास हा सर्वांच्या कष्टाने झाला आहे. यश- अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते, त्यामुळे हतबल होण्याची गरज नाही. आज इथे उपस्थित असणारे आणि नसणारे असे असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांचे पक्षबांधणीत मोठे योगदान आहे.

Supriya Sule
Ajit Pawar: ‘अजितदादां’च्या घोषणांनी दुमदुमले स्टेडियम; बालेवाडीत राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापन दिन मेळावा जल्लोषात

खा. अमोल कोल्हे म्हणाले, 55 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत शरद पवारांनी अनेकांना सत्तेची सावली दिली. जेव्हा ‘पानगळ’ झाली, तेव्हा अनेकांना वाटले की आता सर्व संपले. मात्र, हे लक्षात ठेवले पाहिजे की, सावली देत असताना शरद पवार नावाचा वटवृक्ष तुमच्या यशासाठी उन्हात उभा होता आणि आजही उभा आहे. आजही झगडणार्‍या शेतकर्‍यांपासून ते तरुण आणि माता- भगिनींपर्यंत, सर्वांच्या आशेचा किरण आणि आधार शरद पवारच आहेत.

नीलेश लंके म्हणाले, नेते, कार्यकर्त्यांनी लढण्याची तयारी ठेवावी. आपण संघर्षयोद्धाच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. ही अखंड, अभेद्य तालीम आहे. सगळ्यांनी धीर धरावा. काही जणांना घाई झाली आहे. नेता अजूनही आहे.

आपले जेवढे वय नाही, तेवढा नेत्याचा अनुभव आहे. नेत्याला राजकारणातील फायदे- तोटे, सगळी गणिते जुळवता येत असताना आपण त्यांना पुढे जाण्याचा सल्ला देतो, असा टोला लंके यांनी लगावला. तसेच या वेळी हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, रोहित पवार, फहाद अहमद, मर्जिया पठाण यांनी मनोगत व्यक्त केले.

गेल्या सात वर्षांत जयंत पाटील यांनी नेतृत्व केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चाललो आहोत. त्यांच्या राजीनाम्याविषयी या वक्तव्यामुळे आश्चर्य वाटले. पक्षातील वरिष्ठ नेते बसून चर्चा करून योग्य निर्णय घेतील. त्याचबरोबर शरद पवार यांचे विचार इतर राज्यांत पोहोचले असून, तिकडेही पक्षाला मागणी आहे. महाराष्ट्रात आम्ही आहोतच. आव्हाड, देशमुख आणि टोपे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहून देशाची जबाबदारी घ्यावी.

- रोहित पवार, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news