पुणे

कैद्यांची हिम्मत वाढली : हात फ्रॅक्चर होईपर्यंत तुरुंगाधिकार्‍याला मारहाण

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : येरवडा कारागृहातील कैद्यांमधील मारहाणीचे प्रकार समोर येत असतानाच आता त्यांची हिम्मत आणखी वाढल्याचा प्रकार उघड झाला आहे. आता तर त्यांनी कारागृह अधिकार्‍याला हात फ्रॅक्चर होईपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दहा कैद्यांच्या मदतीने कारागृहात तुरुंग अधिकार्‍याला गंभीर मारहाण केल्याचा प्रकार घडला.

शेरखान पठाण असे जखमी झालेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. येरवडा कारागृहामध्ये बंदिस्त असलेल्या विकी बाळासाहेब कांबळे (रा. बनेश्वर महादेव मंदिरजवळ, धनकवडी) या आरोपीवर कारागृह प्रशासनाने कारवाई करून त्याच्याविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. न्यायाधीन बंदी प्रकाश विठ्ठल रेणुसे (रा. धनकवडी) याच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा तसेच आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल आहे. तो 17 फेब्रुवारी 2018 पासून येरवडा कारागृहात दाखल आहे. कांबळे आणि रेणुसे या दोन्ही कैद्यांना सर्कल क्रमांक 1 मध्ये बंदिस्त ठेवले होते.

15 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास सर्कल क्रमांक एकमध्ये तुरुंग अधिकारी शेरखान पठाण हे नियमितपणे कर्तव्यावर होते. त्या वेळी सर्कल क्रमांक एकमधील आरोपी विकी कांबळे व प्रकाश रेणुसे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू होते. ते वाद पाहून तुरुंग अधिकारी पठाण हे वाद सोडविण्यासाठी गेले असता, त्यांना संबंधित दोन कैद्यांनी आणि इतर दहा कैद्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, कार्यालयात बाजूला असलेली खुर्ची शेरखान पठाण यांना मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, संबंधित ठिकाणी उपस्थित असणार्‍या इतर कैद्यांनी ती अडवली. मारहाणीत शेरखान पठाण यांच्या उजव्या डोळ्याखाली जखम तसेच डाव्या हाताच्या मनगटाला इजा होऊन फ्रॅक्चर झाले आहे. घटनेच्या ठिकाणी इतर अधिकारी, कर्मचारी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

विकी कांबळेवर अनेक गुन्हे

विकी बाळासाहेब कांबळे हा आरोपी शहरातील धनकवडी भागातील रहिवासी आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात मारहाण, धमकी देणे, या कलमांनुसार गुन्हे दाखल आहेत. 25 जानेवारीपासून तो कारागृहात बंदिस्त आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT