उत्तर भारतात थंडीचा विक्रम : यंदा प्रथमच 70 दिवस थंडीचा प्रभाव कायम | पुढारी

उत्तर भारतात थंडीचा विक्रम : यंदा प्रथमच 70 दिवस थंडीचा प्रभाव कायम

आशिष देशमुख

पुणे :  गेल्या पंचवीस वर्षांत यंदा प्रथमच उत्तर भारतात 70 दिवस थंडीचा प्रभाव कायम आहे. हवेच्या वरच्या थरात झोतवार्‍यांचा वेग सतत 130 ते 140 नॉटस इतका आहे. त्यामुळे काश्मीरपासून, पंजाब, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये विक्रमी थंडीने कहर केला आहे. पश्चिमी चक्रवाताची निर्मिती अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांमधून होते. तेथूनच शीतलहरी भारतात प्रवेश करतात. आजवर या शीतलहरींचा इतिहास असा आहे, की त्या टप्प्याटप्प्याने तयार होतात. शीतलहरी चार ते पाच दिवस राहतात. त्यानंतर कमी होतात. पुन्हा आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत नवा पश्चिमी चक्रावात तयार होऊन शीतलहरी तयार होतात. त्यामुळे मानवी शरीराला थंडी झेलण्यास थोडा संधीकाल मिळतो. मात्र, गेल्या पंचवीस वर्षांत सलग 70 दिवसांची थंडी उत्तर भारताने प्रथमच अनुभवली असल्याच्या वृत्ताला भारतीय हवामान विभागाने दुजोरा दिला आहे.

गुरुवारचे कमाल व किमान तापमान

पुणे 33.2( 14.1), नगर 33.6 (17), जळगाव 32.2(14.6), कोल्हापूर 34.1( 19.7), महाबळेश्वर 28.8 (16.5), नाशिक 32.8 (13.6), सांगली 34.8 (18.1), सोलापूर 37 (22), मुंबई 29.8( 19.8), छत्रपती संभाजीनगर 32.5 (16.2), परभणी 33.6 (17.8) आणि नागपूर 30.4 ( 19.8) अंश सेल्सिअस.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तापला

शुक्रवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथील कमाल व किमान तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. सरासरी कमाल तापमान 34 ते 36 अंशांवर गेले, तर किमान तापमान 14 ते 18 अंशांवर आहे. शुक्रवारी नाशिक शहराचे तापमान राज्यात सर्वात कमी 13.6 अंशांवर होते.

झोतवार्‍याची नोंद रडारवर

हवामान विभागाच्या रडारवर वार्‍याचा वेग मोजण्याची यंत्रणा आहे. यंदा डिसेंबर ते फेब—ुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत म्हणजे सुमारे 70 ते 75 दिवस उत्तर भारतात दाट धुके आहे. धुके हे बाष्पयुक्त वार्‍यामुळेच तयार होते. वरच्या हवेतील झोतवार्‍याचा प्रभाव यंदा दीर्घकाळ राहिला. त्यामुळे त्या भागात दाट धुक्याचा प्रभाव विक्रमी दिवस राहिला. रडारने 11 ते 14 किलोमीटर उंच हवेतील वार्‍याचा वेग मोजला. तेव्हा तो वेग 130 ते 140 नॉट इतका आहे. त्यामुळे दाट धुक्याने थंडी जाणवत आहे.

25 फेब्रुवारीपर्यंत राहणार प्रभाव

पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, यंदा उत्तर भारतातील धुक्यामुळे तेथे थंडी जास्त आहे. मात्र मध्य व दक्षिण भारतात थंडी पडली नाही. मात्र, उत्तर भारतातील शीतलहरी या भागावर अधूनमधून येत आहेत. असे वातावरण 25 फेब्रुवारीपर्यंत कायम राहील, असा अंदाज आहे. शुक्रवारपासून विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश भाग तापण्यास सुरुवात झाली आहे.

यंदा किमान तापमानात घट जास्त नाही. उत्तर भारत सोडला तर मध्य व दक्षिण भारतात थंडी पडलीच नाही. मात्र, उत्तर भारतात हवेच्या वरच्या थरात झोतवार्‍यांचा प्रभाव विक्रमी काळ राहिला. दाट धुक्याची चादर सलग 70 ते 75 दिवस कायम राहिल्याने तापमानात फारशी घट नसतानाही थंडी जाणवत आहे. प्रामुख्याने दिल्लीवर खूप प्रभाव पडला. जमिनीपासून 11 ते 14 किलोमीटर उंचीवरच्या हवेत वार्‍यांचा वेग जास्त आहे. हवेत बाष्प जास्त काळ राहिले. त्यामुळे धुके सतत दाट आहे. थंडी जाणवत आहे. प्रत्यक्षात किमान तापमानात जशी हिवाळ्यात घट होते त्यापेक्षा हा प्रकार वेगळा आहे.

– अनुपम कश्यपी, हवामान विभाग प्रमुख, पुणे वेधशाळा.

हेही वाचा

Back to top button