पुणे

पाणी प्रश्न सोडवण्यास प्राधान्य..! पुणे लोकसभा मतदारसंघातील तीनही उमेदवारांचा संकल्प

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणेकरांना भेडसावणार्‍या आणि दिवसेंदिवस तीव्र होणार्‍या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचा संकल्प महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित अशा तिनही उमेदवारांनी व्यक्त केला. या वेळी या उमेदवारांनी राजकीय आरोप प्रत्यारोप आणि टिपण्णी करीत एकमेकांना चिमटेही काढले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने व्हिजन पुणे याविषयावर तीनही प्रमुख उमेदवारांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, आणि वंचितचे वसंत मोरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी, खजिनदार अंजली खमीतकर
उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, शहराचे भौगोलिक क्षेत्र वाढल्याने वाहतूक, पाणी, रस्ते, स्वच्छता आदी प्रश्न भेडसावत आहेत. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी मेट्रोचे जाळे वाढविण्यावर भर देण्यात येईल. तसेच पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन पर्याय शोधण्याचे प्रयत्न असतील.
धंगेकर म्हणाले, भाजप श्रेय घेत असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा आराखडा काँग्रेस सरकारच्या काळात झाला. मुळशी धरणातून पाणी आणण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले दहा वर्षे करत आहेत. मात्र अद्याप पाणी आले नाही. मी खासदार होऊन याचा पाठपुरावा करणार. तसेच पुण्याचे पर्यावरण, वाढती गुन्हेगारी, नागरी प्रश्नांवर आवाज उठविणार आहे. मोरे म्हणाले, शहरात मी विकासाचा कात्रज पॅटर्न राबविणार आहे. माझा अजेंडा कागदावर नाही तर डोक्यात आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दक्षिण भागात महापालिकेचे धरण असावे, यासाठी मी प्रयत्नशील असेल. कोणाच्याही मागे बसून बाके वाजवत बसण्याची भूमिका घेणार नाही.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT