Not a single patient in Pimpri-Chinchwad 
पुणे

ओमायक्रॉन रुग्णांची संख्या लक्षात घेऊन पालिकेची तयारी

backup backup

निर्बंध कडक करणार महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची माहिती

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात ओमायक्रॉनचे 6 रुग्ण उपचार घेत असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यात आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत.

मात्र, रुग्ण संख्या वाढीचा विचार करून महापालिकेने उपचार सुविधेची तयार करून ठेवली आहे.

विषाणूचा संक्रमण वाढू नये म्हणून निर्बंध कडक करण्याचा विचार असल्याचे स्पष्ट करीत आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

महापालिका भवनात सोमवारी (दि.6) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त पाटील म्हणाले की, परदेशातून आलेल्या एकूण 138 जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 86 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले 9 जण पॉझिटिव्ह आहेत.

एकूण 16 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 6 रूग्ण ओमायक्रॉनबाधित आहेत. इतरांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. नागरिकांनी चौकस राहून परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती महापालिकेस द्यावी.

ओमायक्रॉनबाधित रूग्ण सापडल्याने आव्हान निर्माण झाले आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने सर्व तयारी व दक्षता करून ठेवली आहे.

पुढील काही दिवसांत ओमायक्रॉनच्या संक्रमणाची तीव्रता लक्षात येईल. तसेच, रुग्ण संख्या लक्षात घेऊन कोरोना निर्बंधाच्या नियमावलीत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल.

गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाईल. परिस्थिती लक्षात घेऊन पहिली ते सातवीच्या शाळा सुरू किंवा बंदचा निर्णय घेण्यात येईल.नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 26 लाख 86 हजार 852 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक डोस घेतला आहे.

पहिला डोस तब्बल 95 टक्के तर, 70 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांचा कालावधी संपलेले एकूण 1 लाख 99 हजार नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेले नाही.

त्यांनी तत्काळ लस घ्यावी. पालिकेकडे लस उपलब्ध आहे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.भोसरी रुग्णालय ओमायक्रॉन रुग्णांसाठी भोसरी रुग्णालयात 90 बेड असून, आयसीयुचे 12 बेड आहेत.

तेथे परदेशातून आलेल्या कोरोना व ओमायक्रॉन रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिजामाता रुग्णालयात कोरोनाबाधित मुलांसाठी 100 बेड व आयसीयुचे 12 बेडची व्यवस्था आहे.

कोरोनाच्या सर्वसामान्य रुग्णांसाठी थेरगाव रुग्णालयात 200 बेड व 28 आयसीयू बेड आणि आकुर्डी रूग्णालयात 132 बेड व 14 आयसीयू बेडची व्यवस्था केली आहे.

रुग्ण संख्या वाढल्यास ऑटो क्लस्टर व नेहरूनगरचे जम्बो रूग्णालय टप्पाटप्प्याने सुरू केले जाणार आहे. तर, वायसीएम रुग्णालयात नॉनकोविड रूग्णांवर उपचार केले जात आहेत.

तसेच, औधषांचा साठा व मनुष्यबळ तयार ठेवले आहे. गरजनेनुसार पुरवठा वाढविला जाईल. नव्या रुग्णालयांचे स्ट्रॅक्चरल व फायर ऑडीट केले आहे, असे आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT