पुणे : पुढारी वृत्तसेवा : अघोरी जादूटोण्याच्या प्रयोगाद्वारे पतीला जेवणातून नखे व अन्य गोष्टी खायला घालणार्या पत्नीसह सासू-सासरे, मेहुणा, मेहुणी व साडू अशा सहा जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश के. एन. शिंदे यांनी हा आदेश दिला. याबाबत पतीने सासरच्यांविरुध्द वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पत्नीसह सासरच्यांविरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 चे कला 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व त्यांच्या पत्नीची किरकोळ कारणावरून भांडणे होत होती.
ही बाब पत्नीने तिच्या सासू-सासर्यांना सांगितली. फिर्यादीवर अघोरी जादूटोण्याचा प्रयोग करून त्यांना नखे खायला घालणे, मायाजाळ नावाच्या वस्तूसह इतर वस्तू खायला देणे, असे प्रकार केले होते. याबाबत मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग मिळाल्याचे त्यांनी सासू-सार्यांना सांगितले असता सासरकडच्यांनी फिर्यादीला मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अद्याप अटक झालेली नाही.
या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यास सरकार पक्षातर्फे सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपींनी भोंदूबाबा यांच्या सांगण्यावरून फिर्यादी यांना कोणकोणत्या वस्तू खायला दिल्या आहेत, याचा सखोल तपास करायचा आहे. आरोपींचे मोबाईल जप्त करायचे आहेत. आरोपींचा गुन्हा अंधश्रद्धेला जाणीवपूर्वक प्रोत्साहन देणारा आहे. संगनमत करून फिर्यादी पतीला जादूटोणा करून वश करण्याचा प्रयत्न आरोपींनी केल्याचा युक्तिवाद अॅड. अगरवाल यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत सहाही जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.