बारामती: पत्नीचा खून करत पुरावे नष्ट केल्याच्या खटल्यात मयूर गोरख गायकवाड (रा. शक्तिछाया हॉस्पिटलसमोर, यवत, ता. दौंड) याला येथील जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
ही घटना दि. 18 जानेवारी 2014 रोजी घडली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून तिला शिवीगाळ व दमदाटी करत पत्नी प्रमिला यांचा मयूर याने गळा दाबून खून केला. पत्नीने स्वतःहून गळफास घेतल्याचा बनाव रचत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत दि. 19 जानेवारी 2014 रोजी अरुण रामदास जाधव यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी मयूर याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
या खटल्यात सरकारपक्षाच्या वतीने ॲड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. डॉ. रमेश जाधव यांची साक्ष यात महत्त्वपूर्ण ठरली. हाताने गळा दाबून मयताचा खून झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तपासी अधिकारी बी. एन. गावडे यांचीही साक्ष नोंदविण्यात आली. उपलब्ध साक्षी व ॲड. शिंगाडे यांनी केलेला युक्तिवाद ग््रााह्य धरत न्यायालयाने जन्मठेप व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी दोन महिने साधी कैद तसेच पुरावा नष्ट केल्यामुळे 7 वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, उपनिरीक्षक गोरख कसपटे, अंमलदार वेणुनाद ढोपरे यांनी सरकार पक्षाला साहाय्य केले.