मंचर: कांद्यावरील संपूर्ण निर्यात शुल्क रद्द करावे, अन्यथा पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून मंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावू, त्यांच्यावर कांदे फेकू, त्यांच्या गळ्यात कांद्याच्या माळा घालू, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी आता माघार घेणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी मंगळवारी (दि. 19) दिली.
कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर (ता.आंबेगाव) येथे आंदोलन झाले, त्यावेळी बांगर बोलत होते. प्रकाश कोळेकर, संजय पालेकर, काशिनाथ दौंडकर, नवनाथ पोखरकर, केशव पोखरकर, बाबाजी पोखरकर, नारायण थोरात, भालचंद्र बोठे, पंकज गावडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (Latest Pune News)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात कांद्याच्या माळा गळ्यात घालून सरकारच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
बांगर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सरकारने कांद्याचे निर्यात खुली केली असे सांगतात मात्र बांगलादेशच्या सीमेवर कांद्याचे ट्रक अडवून ठेवले आहेत. अजूनही कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केले नाही. कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.
सत्ताधारी केंद्र आणि राज्य सरकार हे लबाडांचे आहे.शेतकर्यांच्या मुळावर उठलेले सरकार आहे. दूध , कांदा उत्पादक शेतकर्यांना बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे.याला सर्वस्वी सरकार जबाबदार असून सत्ताधार्यांचेकार्यक्रम उधळून लाऊ.असा इशारा देखील प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.
या वेळी वनाजी बांगर, तुकाराम गावडे, संतोष पवार, मारुती गोरडे यांची भाषणे झाली. मंचर बाजार समितीच्या आवारातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकार्यांनी सरकार विरुद्ध घोषणा देत बाजार समितीसमोर असलेल्या पुणे-नाशिक हमरस्त्यावर येऊन रस्त्यावर कांदे फेकून सरकारच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला. मंचर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला