

पुणे: गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून, विसर्जन मिरवणुकीबाबत आठवडाभरात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, वरिष्ठ पोलिस अधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच प्रमुख मंडळांचे सुमारे 500 पदाधिकारी उपस्थित होते. (Latest Pune News)
काही मंडळांनी यंदा विसर्जन मिरवणूक सकाळी सात वाजता सुरू करण्याची मागणी केली आहे. अखिल मंडई मंडळ व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाने लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
अमितेश कुमार म्हणाले, ‘पोलिसांच्या द़ृष्टीने सर्व मंडळे समान आहेत. मात्र, प्राणप्रतिष्ठा ते विसर्जनकाळात पोलिस, महापालिका व जिल्हा प्रशासनाने एकत्र येऊन बंदोबस्ताची आखणी केली आहे. कार्यकर्त्यांच्या सूचनांचा विचार करून उत्सवापूर्वीच सर्वांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल. कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळेच उत्सव सुरळीत पार पडेल,’ असेही त्यांनी सांगितले.
उत्सवावर निर्बंध नकोत; परंतु कार्यकर्त्यांनी न्यायालयाचे आदेश पाळणे बंधनकारक आहे. शहरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडावेत. गर्दी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आत्तापासून पाहणी सुरू ठेवावी, असेही आवाहन या वेळी करण्यात आले.
मद्यप्राशनास मज्जाव
प्रशासनाने प्राणप्रतिष्ठापना व विसर्जन दिवशी मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. कोणी मद्यप्राशन करून मिरवणुकीत आल्यास कार्यकर्त्यांनी त्याला रोखावे, असेही आवाहन पोलिस आयुक्तांनी केले.
गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून शासनाने जाहीर केला आहे. उत्सवासाठी पोलिस, प्रशासन एकत्र येऊन काम करीत आहे. प्रशासनाला सहकार्य करावे.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे
उत्सवातील दहा दिवस मंगलमय असतात. तो आनंददायी होण्यासाठी उत्सवात शिस्त हवी. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सूचना जरूर कराव्यात. मात्र, प्रशासनावर अविश्वास व्यक्त करू नये. उत्सवापूर्वी महापालिकेकडून सर्व कामे करण्यात येत आहेत. रस्तादुरुस्तीबाबत काही सूचना असल्यास ‘रोडमित्र’ अॅपवर द्याव्यात.
- नवल किशोर राम, आयुक्त, पुणे