Ward 11 Urban Issues Pune Pudhari
पुणे

Ward 11 Urban Issues Pune: नागरीकरणाला गती, सुविधांची अधोगती

उंच इमारतींची वाढ, पण मूलभूत सुविधा शून्य; पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, कचरा आणि पूरस्थितीने नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक : 11 रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर

दीपक पाटील

प्रभाग क्रमांक अकरामध्ये नागरीकरण दिवसेंदिवस वाढत असून, जुन्या सोसायट्या पाडून त्याठिकाणी उंच टॉवर उभारले जात आहेत. मात्र रस्ते आणि ड्रेनेज लाइन पूर्वीच्या असल्याने नागरिकांना अनेक समस्यांच्या सामोरे जावे लागत आहे. तसेच वाहतूक कोंडी, रस्त्यांवर अनधिकृत भाजी मंडई आणि अतिक्रमणे, कचरा, पावसाळ्यातील पूरस्थिती, अपुरा पाणीपुरवठा यासह विविध समस्यांना समोरे जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

या प्रभागाची ऐकूण लोकसंख्या 76 हजार 204 असून, त्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील 5 हजार 569, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील 574 नागरिकांचा समावेश आहे. महापालिकेत सध्या प्रशासक राज असल्यामुळे आणि नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी नगरसेवक नसल्याने प्रभागातील अनेक समस्या ‌‘जैसे थे‌’ आहेत. राजमाता जिजाऊ नगरच्या (सुतारदरा) काही भागात पाणीपुरवठ्यासह ड्रेनेज लाईनची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रभागात अनेक जुन्या सोसायट्या पाडून त्याठिकाणी उंच इमारती उभारल्या जात आहेत. मात्र रस्ते आणि ड्रेनेज लाइन पूर्वीच्या असल्याने विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

परिसरातील रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अतिक्रमण कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्याने परिसरात अतिक्रमणे वाढत आहेत. रस्ते अतिक्रमणांच्या विळख्यात अडकल्याने वाहनचालकांना वाहने चालवणे देखील अवघड होत आहे. गेल्या काळात परिसरातील विविध प्रश्न आणि नागरी समस्यांकडे माजी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

प्रभागात या भागाचा समावेश

केळेवाडी, हनुमाननगर, राउतवाडी, जयभवानीनगर, किष्किंधानगर, राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) सोसायटी,

शिवतीर्थनगर, रामबाग कॉलनी, माजी सैनिक वसाहत, एमआयटी परिसर आदी.

ही कामे होणे अपेक्षित

नागरिकांसाठी भाजी मंडईची व्यवस्था

वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना

जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाइनच्या कामांची गरज

पुराची समस्या सोडविण्यासाठी पावसाळी वाहिन्या टाकणे

मुले आणि नागरिकांसाठी उद्यानांची निर्मिती करणे

राजमाता जिजाऊनगरमध्ये पोलिस चौकीची आवश्यकता

प्रभागातील प्रमुख समस्या

मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर

अनधिकृत भाजी मंडई आणि पथारी व्यावसायिकांची अतिक्रमणे

पौडफाटा, हेवन चौक, कोथरूड डेपो, वनाज कॉर्नर चौकातील होणारी वाहतूक कोंडी

म्हातोबानगर, किष्किंधानगर, राजमाता जिजाऊनगरमध्ये रस्त्यांची कामे अर्धवट

राजमाता जिजाऊनगरमध्ये सार्वजनिक स्वछतागृहांचा अभाव

मुले, नागरिकांसाठी उद्यानांची कमतरता, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव

जय भवानीनगर, राजमाता जिजाऊनगर आणि किष्किंधानगरमध्ये पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती

रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेले

कचऱ्याचे ढिग

कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा

माननीयांना द्यावी लागतील या प्रश्नांची उत्तरे

गेल्या काळात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना का झाल्या नाहीत?

मुख्य आणि अंतर्गत

रस्त्यांवरील अतिक्रमणे का

हटविली जात नाहीत?

जागोजागी अनधिकृत भाजी मंडई राजरोसपणे कशी सुरू आहेत?

नाल्यांचे प्रवाह का वळविण्यात आले अन्‌‍ त्यातून सांडपाणी का वाहते?

प्रभागातील विश्वशांती चौक ते इंदिरा पार्क रस्त्याचे डांबरीकरणाचे काम केले. माजी सैनिक सोसायटी, स्वयंसिद्ध सोसायटी या ठिकाणी युटी डब्ल्यूटी रस्ता केला. राऊत दवाखान्यात डायलेसिस सेंटर सुरू केले. पदपथ, साइन बोर्ड झेब्रा क्रॉसिंग पट्टे आदी कामे झालेली आहेत. तसेच विविध विकासकामे गेल्या काळात मार्गी लावण्यात आली आहेत.
दीपक मानकर, माजी नगरसेवक
जय भवानीनगर येथे दवाखान्यात नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा निधी उपलब्ध करून दिला आहे. किष्किंधानगरमध्ये नवयुग मित्रमंडळाजवळ समाजमंदिर बाधण्यात आले आहे. साईबाबा मंदिराजवळ लोकहितासाठी इमारत बांधण्यात आली आहे.
वैशाली मराठे, माजी नगरसेविका
सहा गुंठे जागेत पाण्याच्या टाकीचे काम सुरू केले. राजमाता जिजाऊनगरमध्ये काँक्रिटीकरण आणि नवीन ड्रेनेज लाइनचे काम केले आहे. तसेच वेळोवेळी ड्रेनेज लाइन साफसफाई करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.
रामचंद्र कदम, माजी नगरसेवक
केळेवाडी येथे समाजमंदिर बांधले आहे. जय भवानीनगरमधीन मुख्य रस्त्याचे काम केले आहे. यासह विविध विकासकामे केली आहेत.
छाया मारणे, माजी नगरसेविका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT