baal aadhaar card Pudhari
पुणे

Postman Kaka Aadhaar: बालकांचे आधार कार्ड काढणार पोस्टमन काका

पाच वर्षांखालील बालकांसाठी नवीन आधार नोंदणी मोहीम

पुढारी वृत्तसेवा

खराळवाडी: पाच वर्षांखालील बालकांचे आधार कार्ड सहज आणि सुलभ पद्धतीने तयार व्हावे, यासाठी टपाल विभागाच्या 'पोस्टमन काका' उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या उपक्रमांतर्गत पोस्टमन नागरिकांच्या दारात जाऊन बालकांची आधार नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देत असल्याने पालकांची शासकीय कार्यालयांतील धावपळ आणि रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी झाला आहे.

पूर्वी लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी पालकांना आधार केंद्रांवर अनेकदा फेऱ्या माराव्या लागत होत्या. नवजात आणि लहान बालकांना घेऊन जाणे, दीर्घ प्रतीक्षा आणि कागदपत्रांची पडताळणी या प्रक्रियेमुळे अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता पोस्टमनच्या माध्यमातून ही सेवा घरपोच उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पाच वर्षांखालील बालकांच्या आधार नोंदणीसाठी बायोमेट्रिक (बोटांचे ठसे व डोळ्यांची नोंद) घेतली जात नाही. बालकाचा फोटो, जन्मदाखला आणि आई किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाशी जोडून आधार कार्ड तयार केले जाते.

बालक पाच वर्षांचे झाल्यानंतर बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करणे आवश्यक असते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ, शाळेत प्रवेश, आरोग्यसेवा तसेच भविष्यातील अनेक शासकीय कामांसाठी आधार कार्ड महत्त्वाचे असल्याने जन्मानंतर शक्य तितक्या लवकर बालकाची आधार नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पालकांना मिळतोय दिलासा

या उपक्रमामुळे टपाल विभाग केवळ पत्रे आणि पार्सल पोहोचवणारी यंत्रणा न राहता नागरिकांना डिजिटल शासकीय सेवा घरपोच देणारा विश्वासार्ह दुवा बनत आहे. विशेषतः पाच वर्षांखालील बालकांच्या आधार नोंदणीसाठी ''पोस्टमन काका'' उपक्रम पालकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

उपक्रमाचे प्रमुख फायदे

घरपोच आधार नोंदणीची सुविधा.

पालकांची वेळ आणि खर्चाची बचत.

लहान बालकांना आधार केंद्रावर नेण्याची गरज कमी.

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र लवकर उपलब्ध.

दुर्गम भागातील नागरिकांनाही आधार सेवा सुलभ.

पालकांचे हेलपाटे वाचले

भारत सरकारच्या टपाल विभागाच्या वतीने भारतातील सर्व टपाल कार्यालयामधून लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासंदर्भात नवीन मोहीम हाती घेण्यात आली आहे. आता भारतातील कोणत्याही टपाल कार्यालयातील पोस्टमन काका त्यांच्यासोबत असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून पाच वर्षांच्या आतील बालकांचे आधार कार्ड अगदी मोफत काढून देणार आहेत. त्यामुळे जवळच्या आधार सेंटरमध्ये जाऊन आधार कार्ड काढण्याकरता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. त्यासाठी भारतीय टपाल विभागाने "सीईएलसी" (Child Enrollment Lite Client) हे मोबाईल ॲप्लिकेशन देखील कार्यान्वित केले आहे. सबंध भारतातील टपाल कार्यालय या ॲपच्या माध्यमातून लहान बालकांचे आधार कार्ड काढून देत आहे.

पिंपरी चिंचवडमधील मुख्य वितरण टपाल कार्यालयामध्ये प्रामुख्याने ही सुविधा पोस्टमनच्या माध्यमातून ग्राहकांना घेता येईल. यासाठी सकाळच्या सत्रामध्ये नागरिकांनी वितरण कार्यालयामध्ये पोस्टमन काकांशी संपर्क साधावा.
- समीर महाजन, पुणे शहर पूर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी व अधीक्षक डाकघर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT