कसबा पेठ : दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात निर्माल्य गोळा करण्याची तसेच हौदांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था पुणे महानगरपालिकेकडून केली जाते. मात्र, दसऱ्यानंतर नवरात्रातील घटाचे निर्माल्य गोळा करण्यासाठी व देवी विसर्जनासाठी हौदाची व्यवस्था महापालिकेकडून न केल्याने मुठा नदी घाटपरिसरातील आपटे घाट, टिळक पूल परिसरात निर्माल्य व घटाच्या साहित्यांचे ढीग ठिकठिकाणी साचलेले दिसतात.(Latest Pune News)
त्यामुळे यंदातरी घाटावर निर्माल्य कलश व विसर्जन घाट यांचे पूर्वनियोजन महापालिका करणार की फक्त बघ्याची भूमिका घेणार? असा सवाल स्थानिक नागरिकांमधून उपस्थित झाला आहे.
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नागरिक घटाचे साहित्य नदीपात्रात किंवा नदीत आणून सोडतात. हे माहीत असूनसुद्धा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आपटे घाट परिसरात कोणतीही उपाययोजना मागील वर्षी करण्यात आली नव्हती. कोणत्याच प्रकारचे निर्माल्य कलश, प्रत्येक ठिकाणी कंटेनर तसेच पालिकेचे कर्मचारी आपटे घाटावर दिसत नसल्याने आपटे घाटावर निर्माल्यांचे ढीग साचलेले दिसत होते.
मुठा नदी पात्रानजीकच्या शनिवार पेठ, नारायण, सदाशिव आणि कसबा पेठ, पुलाची वाडी, भांबुर्डा परिसरातील नागरिक सकाळपासून घट विसर्जन करण्यासाठी तसेच घटाचे साहित्य नदीपात्रात सोडण्यासाठी येत असतात. काहीजण सिद्धेश्वर घाटावरील नदीपात्रातील कठड्यावर बसून नदीत घटसाहित्य सोडताना दिसतात. काही नागरिक नदीकाठच्या पायऱ्यांवर घटाचे साहित्य ठेवून जातात. त्यामुळे या परिसरात निर्माल्य संकलनाची सोय करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दसरा या उत्सवानंतर पूजेचे घट व निर्माल्य नागरिकांनी नदीमध्ये सोडू नये म्हणून पटवर्धन समाधी विसर्जन हौद नदीपात्र परिसरात पूजेचे घट विसर्जन करण्याची व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेची पाहणी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी केली असून, तेथील व्यवस्थेबाबत सूचना केल्या आहेत.आतिक सय्यद, आरोग्य निरीक्षक, कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय
मागील वर्षी आपटे घाटावर साठलेले निर्माल्याचे ढीग.