पुणे: प्लास्टर ऑफ पॅरिसपासून गणेशमूर्ती तयार कराव्यात की नाही, याबाबत मूर्तिकार संभ्रमात होते. ही बंदी मागे घेण्यास10 जून ही तारीख उजाडली. परिणामी, 9 जूनपर्यंत पीओपीच्या मूर्तीचे काम थांबले होते. त्यामुळे यंदा जुलैअखेरपर्यंत 50 टक्केच मूर्ती तयार झाल्याने यंदा बाप्पाच्या मूर्ती 25 ते 30 टक्क्यांनी महाग झाल्या आहेत.
पीओपी मूर्ती तयार करण्यावर न्यायालयाने बंदी घातल्याने यंदा कारागिरांचे एप्रिल ते जूनपर्यंत असे 70 ते 72 दिवस हातातून गेले. बंदी असल्याने पीओपीच्या छोट्या मूर्ती तयार करण्याचे काम ठप्प होते. बंदी शिथील होईल की नाही, याबाबत साशंकता होती. (Latest Pune News)
त्यामुळे मूर्तीकार द्विधा स्थितीत होते. दरवर्षी गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचे काम एप्रिलमध्येच सुरू होते. मे महिन्यात छोट्या मूर्ती तयार होऊन जातात. त्याचे रंगकामही झालेले असते. जून आणि जुलै या दोन महिन्यात मोठ्या मूर्ती तयार करण्यावर भर असतो. मात्र, यंदा हे सर्वच वेळापत्रक बिघडल्याने पीओपीच्या मूर्ती तयार करण्यास कमी कालावधी खूपच कमी मिळाल्याने 50 टक्केच पीओपीच्या मूर्ती तयार करता आल्याच्या भावना मूर्तीकारांनी व्यक्त केल्या आहेत.
शहरातील स्थिती...
- पुणे, पिंपरी- चिंचवडसह परिसरात सुमारे आठशे ते नऊशे मूर्तिकार कार्यरत आहेत.
- शिवाजीनगर, कसबा पेठ, नारायण पेठ, चिंचवड, हडपसर, साठेवस्ती या भागांमध्ये मूर्तींची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
- मार्गदर्शक तत्त्वांनुसार : शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य असून शाडूमूर्तींना विशिष्ट मर्यादांमध्ये पर्यावरणपूरक रंग वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.
- यंदा शाडू मूर्तींच्या किमतीत 20 ते 25 टक्यांनी वाढ झाली
- कारणे : शाडू मातीची कमतरता, उत्पादन खर्चात वाढ
- कामगारांची पगार वाढ, मूूर्तिकारांच्या मेहनतानात वाढ
- पर्यावरणपूरक रंगांच्या किमतीत वाढ, गुणवत्ता नियंत्रणाचे खर्च, इंधन आणि वाहतूक खर्च वाढले.
शाडू मातीच्या मूर्तीची मागणी वाढली
मूर्तिकारांच्या मते, पीओपीच्या मूर्ती या लवकर तयार होतात. त्यातुलनेत शाडू मातीच्या मूर्तीना खूप वेळ लागतो. तरीही यंदा मूर्तिकारांनी शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. मात्र, मे आणि जून महिन्यात खूप पाऊस झाल्याने मूर्तिकारांची तारांबळ उडाली. या मूर्ती खूप संथ वेगाने तयार झाल्या, त्यामुळे त्यांचे रंगकामही उशिरा झाले.
यंदा 10 रोजी पीओपीच्या मूर्तीवरील बंदी उठली. मात्र, तोवर खूप उशीर झाला होता. 9 जूनपर्यंत मूर्तीकाम बंद होते. कारण, पीओपीच्या मूर्तीची महापालिका तपासणी करणार, असे समजले होते. मात्र, ती बंदी शिथील होण्यास उशीर झाला. दोन महिने काम थांबल्याने यंदा 50 टक्केच मूर्ती तयार करता आल्या. त्यामुळे गणपतीच्या मूर्ती यंदा 25 ते 30 टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. मी या व्यवसायात गेली 40 वर्षे असून माझी तिसरी पिढी आहे.- राजेश शिंदे, मूर्तिकार, सुखसागरनगर
पीओपीच्या मूर्तींना महिनाभरापूर्वी परवानगी मिळाल्याने यंदा मूर्तीकाम उशिराने सुरू झाले. त्यात कमी वेळेत जास्त काम असल्याने कामगारांनाही मागणी वाढल्याने त्यांच्या मजुरीतही वाढ झाली आहे. याखेरीज मूर्ती तयार करण्यापासून रंगकामापर्यंत सर्वांच्याच किमतीत वाढ झाली आहे. या सर्वांचा परिणाम मूर्तींच्या दरावर झाला आहे.- गणेश कुंभार, मूर्तिकार, गणेश आर्ट्स, लोहगाव