

Mixed Garbage Management Problem
पुणे: पुणेकरांना सकाळी शहर स्वच्छ दिसावे, यासाठी महापालिकेमार्फत रात्री स्वच्छता कर्मचार्यांना ड्युटी लावून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत रोज 200 ते 250 मेट्रिक टन उचलला जातो.
या मोहिमेचे पुणेकरांनी स्वागत केले असले, तरी रात्री कचर्याचे विलगीकरण होत नसल्याने मिश्र कचर्याचे प्रमाण तब्बल 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे ही मोहीम चांगली असली, तरी पालिकेच्या कर्मचार्यांची मात्र डोकेदुखी वाढणार आहे. (Latest Pune News)
पुण्यात स्वच्छता योग्य प्रकारे होत नसल्याने आयुक्त नवल किशोर राम यांनी रात्रीच रस्त्यावरील कचरा उचलण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार घनकचरा विभागाने आयुक्तांच्या सूचनेनुसार रात्रीतूनच शहर स्वच्छ करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. यासाठी 1472 कर्मचार्यांची रात्रीची ड्युटीदेखील लावण्यात आली. तसेच कचरा उचलण्यासाठी 213 वाहनांचीदेखील मदत घेतली जात आहे.
पालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांमार्फत रोज 200 ते 250 मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. मात्र, या कचर्यात मिश्र कचर्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. हे प्रमाण तब्बल 15 ते 20 टक्के असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
पहाटे कचरा गोळा करून तो रॅम्पवर नेला जातो. या कचर्याचे विलगीकरण येथे केले जाते. मात्र, ही यंत्रणा रात्री बंद असल्याने रात्री गोळा केलेल्या कचर्याचे योग्य पद्धतीने विलगीकरण होत नाही. त्यामुळे मिश्र कचर्याची समस्या वाढली असल्याचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले.
दोन टप्प्यांत होतो कचरा गोळा
पुण्यात जागोजागी कचरा पडून राहत असल्याने अनेक नागरिकांनी यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. आयुक्त नवल किशोर राम यांनी पदभार स्वीकारल्यावर शहरस्वच्छतेला प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच, दिवसा योग्य प्रकारे स्वच्छता होत नसल्याने रात्री कर्मचार्यांकडून शहर स्वच्छ करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार शहरात रात्री 9 ते पहाटे 6 व सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत अशा दोन टप्प्यांत कचरा गोळा केला जातो.
महानगरपालिकेच्या कर्मचार्यांमार्फत रात्री कचरा उचलला जातो. या कचर्यात ओला आणि सुका अशा मिश्र कचर्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्वच्छता विभागाचे तब्बल 30 टक्के कर्मचारी रात्री परिसर स्वच्छ करतात. मिश्र कचर्यासोबतच रात्री शहर स्वच्छ करणार्या कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांत कर्मचार्यांवर हल्ला करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. ही बाब चिंताजनक आहे.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका.