

पुणे: हृदय, मूत्रपिंड, यकृत यांसारख्या अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी सध्या रुग्णांना 10 ते 20 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. मात्र, आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहे.
राज्य सरकारने योजनेत मोठा बदल करीत अवयव प्रत्यारोपणाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यारोपणासाठी रुग्णालयांना 5 लाख रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त लागणारा जादा खर्चही विशेष निधीतून भरला जाणार आहे. (Latest Pune News)
अवयव प्रत्यारोपणासारख्या महागड्या शस्त्रक्रिया व उपचारांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आरोग्य विभागाच्या अन्य योजनांची सांगड घालून संपूर्ण उपचार मोफत करण्यासाठी धोरण तयार करण्याबाबतच्या सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मार्च महिन्यात दिल्या होत्या. याबाबत जलद गतीने कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.
राज्यातील हजारो रुग्णांना दर वर्षी अवयव प्रत्यारोपणाची गरज भासते. मात्र, लाखोंच्या घरातील खर्चामुळे हे उपचार विशिष्ट आर्थिक वर्गापुरतेच मर्यादित होते. आता महात्मा फुले योजनेत यांचा समावेश झाल्याने सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील प्रत्यारोपण प्रक्रियांना वेग मिळेल आणि मृत्युदरही कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे.
ऑनलाइन प्रक्रिया, थेट रुग्णालयांना पैसे
योजनेचा सर्व खर्च राज्य सरकारकडून थेट रुग्णालयांना अदा केला जाणार असून, प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन करण्यात आली आहे. बिले मंजूर होऊन एका महिन्यात निधी रुग्णालयांना मिळेल. यामुळे रुग्णालयांची भागीदारी वाढण्याची शक्यता आहे. अधिक खासगी रुग्णालये योजनेत सहभागी व्हावीत म्हणून उपचार दर वाढवण्याचा प्रस्ताव असून, रुग्णालयांना या शस्त्रक्रियांसाठी दर महिन्याला मंजूर बिले आणि निधी मिळणार आहे.
रुग्णांसाठी फायदे
अवयव प्रत्यारोपण मोफत
5 लाखांचे पॅकेज आणि विशेष निधी
प्रक्रिया जलद आणि पारदर्शक
आर्थिक अडचणीमुळे उपचार थांबणार नाहीत