पुणे

पिंपरीत माथाडी कामगार कार्यालय इमारतीची दुरवस्था

backup backup

घाणीमुळे परिसरात पसरली दुर्गंधी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुढारी वृत्तसेवा चिंचवड येथील आनंदनगर परिसरातील माथाडी कामगार कार्यालय इमारतीची दुरवस्था झाली आहे. येथील अस्वच्छतेमुळे कर्मचारी व नागरिकांना तोंडाला रुमाल लावून प्रवेश करावा लागत आहे.

चिंचवड मालधक्काजवळ गुलनूर बिल्डिंगमध्ये हे कार्यालय आहे. बिल्डिंगच्या खाली मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त कचरा साठला आहे.
या परिसरात जागा मिळेल तिथे लघुशंका केल्याने परिसरात किळसवाणी दुर्गंधी पसरली आहे.

तसेच, कार्यलयाकडे जाणार्‍या पायर्‍या, खिडक्यांची दुरवस्था झाली आहे. इमारत दारूचा अड्डा झाला असून, दारूच्या बाटल्या आणि सिगारेट, बिडीची थोटके जागोजागी पडलेली दिसून येत आहेत.

महावीर चौकातून चिंचवडकडे जाताना उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूला जुनी गुलनूर बिल्डिंग आहे. यामध्ये दुसर्‍या मजल्यावर माथाडी कामगार कार्यालय आहे.

कमर्शियल असलेल्या या इमारतीत माथाडी कामगार कार्यालय व शॉप अ‍ॅक्ट कार्यालय ही दोन कार्यालय आहेत. इमारतीच्या समोर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

वेगवेगळा दुर्गंधीयुक्त कचरा इमारतीसमोर साठला आहे. बंद असलेल्या गाळ्यासमोर नागरिकांनी प्लास्टिक बॉटल्स, पिशव्या, दारूच्या बाटल्या फेकलेल्या आहेत. तळमजल्याला असलेली मुतारी तुटली असून, त्यामध्ये किळसवाणी घाण साठलेली आहे.

इमारतीत प्रवेश करताच गुटखा खाऊन पिचकारी मारलेल्या लालभडक भिंती स्वागत करतात. जीर्ण झालेल्या इमारतीच्या खिडक्या तुटून पडलेल्या आहेत. जिन्याचा काही भाग पडलेला आहे, सुरक्षेसाठी लावण्यात आलेले लोखंडी बारही तुटलेले आहेत.

इमारतीत बाहेरच्या गाळ्यात वीजव्यवस्था नसल्याने कार्यालय शोधण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तसेच, इमारतीच्या बाहेर कार्यालयाचा केलेला नामोल्लेख पुसट झाला आहे.

इमारतीची गच्ची दारुचा अड्डा बनला असून दारूच्या बाटल्या येथेच फेकून दिल्या आहेत तसेच अनेक बाटल्या फोडून काचा तिथेच पडलेल्या आहेत.

इमारत परिसर आणि इमारतीत स्वच्छता ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मात्र, इमारत झोपडपट्टी भागात येत असल्याने आसपासच्या परिसरातील नागरिक अस्वच्छता करतात. त्यासोबतच इमारतीला सुरक्षारक्षक नसल्याने त्याचा गैरफायदा स्थानिक नागरिक घेत आहेत.
– बाळासाहेब वाघ, कामगार उपायुक्त.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT