Pooja Khedkar absent despite summons
समन्स बजावूनही पूजा खेडकर गैरहजर pudhari File Photo
पुणे

IAS Pooja Khedkar | समन्स बजावूनही पूजा खेडकर गैरहजर

पुढारी वृत्तसेवा

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याविरुद्ध छळवणुकीच्या तक्रार प्रकरणात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना समन्स बजाविण्यात आले आहे. जबाब नोंदविण्यासाठी त्यांनी दोन दिवसांचा अवधी पुणे पोलिसांकडे मागितला होता.

दरम्यान, दोनवेळा समन्स बजावूनही खेडकर शनिवारी सायंकाळपर्यंत जबाब नोंदविण्यासाठी उपस्थित राहिल्या नाहीत. प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध वाशिममध्ये छळवणुकीची तक्रार दिली होती. हा प्रकार पुण्यातील असल्यामुळे तक्रारीच्या अनुषंगाने खेडकर यांनी पुणे पोलिसांकडे जबाब नोंदविण्याचे आदेश देण्यात आले होते.

खेडकर यांना समन्स बजाविण्यात आले होते. खेडकर यांना समन्स बजाविण्यात आल्यानंतर त्यांनी दोन दिवसांचा अवधी पुणे पोलिसांकडे मागितला होता. शनिवारी सायंकाळी त्या पुण्यात येतील, अशी शक्यता होती. मात्र, सायंकाळपर्यंत खेडकर पुण्यात आल्या नाहीत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

खेडकर यांची आयएएस अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती, या कालावधीत दिवसे यांनी छळ केल्याचा आरोप खेडकर यांनी केला आहे. खेडकर यांची वाशिम पोलिसांनी सोमवारी चौकशी केली.

खेडकर यांनी नोंदविलेल्या जबाबात जिल्हाधिकारी दिवसे यांनी छळवणूक केल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील असल्यामुळे ही तक्रार वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केली.

याप्रकरणी पोलिसांनी खेडकर यांना दोनवेळा समन्स बजाविले म्हणणे मांडल्यानंतर कारवाई पूजा खेडकर यांनी सादर केलेले दृष्टिदोष प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला सादर केले होते. आई-वडिलांचे नाव, स्वाक्षरी, ई-मेल, पत्ता बदलून फसवणूक केल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले.

त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले.

सोमवारी जबाब नोंदविण्याची शक्यता

पुण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी पूजा खेडकर यांनी आपण इकडे-तिकडे जबाब देण्यापेक्षा पोलिस आयुक्तालयातील भरोसा सेलमध्ये येऊन जबाब देण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र, शनिवारी आणि रविवारी फ्रेंदीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात असल्याने सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी बंदोबस्तात व्यस्त आहेत.

यामुळे खेडकर यांचा जबाब सोमवारी नोंदविला जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्या सध्या पुण्यात आहेत की इतरत्र कोठे, हे समजू शकले नाही. त्या पुण्यातील राहत्या घरी आल्या नसल्याची माहिती सोसायटीच्या सदस्यांनी दिली. त्यांच्या आई मनोरमा सध्या ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत आहेत, तर वडिलांना शुक्रवारी जामीन मिळाला आहे.

SCROLL FOR NEXT