नायगाव: पोंढे (ता. पुरंदर) येथे खडीमशिन प्रकल्पासाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करून ग्रामस्थांच्या भवितव्याचा व न्यायप्रवीष्ट बाबींचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा, अशी भावनिक साद पोंढे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना घातली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पोंढे येथील कैलास इंगळे यांनी पूर्वीच्या गट क्रमांक ८६ मधील जागा खरेदी करून खडीमशिन आणि अन्य प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली होती. या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच ग्रामस्थांचा विरोध आहे. ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून आणि प्रशासनाला हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने परवानगी मिळविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
प्रकल्पाला विरोध करणाऱ्या काही ग्रामस्थांची नावे परवानगी प्रक्रियेदरम्यान सूचक व अनुमोदक म्हणून नोंदविण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ग्रामसभेच्या दिवशी ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात विरोध नोंदविला होता. मात्र, या पत्राला अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यानंतर ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे दाद मागितली. मात्र, तेथूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, ग्रामसभेत यापूर्वी देण्यात आलेली परवानगी नियमबाह्य असल्याचे सांगत ती रद्द करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. तसेच गावाला धोकादायक ठरू शकणाऱ्या प्रकल्पांना भविष्यात परवानगी देऊ नये, असा ठरावही ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आला. असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खडीमशिन प्रकल्पाला परवानगी देण्यात आल्याने ग्रामसभेच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रकल्पामुळे शेती, पाण्याचे स्रोत, पर्यावरण तसेच प्राणी-पक्ष्यांच्या अधिवासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आणून दिले. प्रकल्पालगत वन विभागाचे क्षेत्र असून, वन्यजीवांनाही धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
तसेच, प्रकल्पासाठीची वाहतूक गावाच्या मध्यभागातून होणार असल्याने ग्रामस्थ आणि विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. ग्रामस्थांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन त्यांच्या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
धनदांडग्यांची दादागिरी
गावाला धोकादायक ठरू शकणाऱ्या प्रकल्पांसाठीचे रस्ते बंद करण्याचा अधिकार ग्रामसभेने राखून ठेवला होता. त्यानुसार ग्रामस्थांनी गट क्रमांक ८६ कडे खासगी मालकीतून जाणारा रस्ता बंद केला होता. मात्र, प्रकल्प उभारणाऱ्या संबंधितांनी दादागिरी करून हा रस्ता पुन्हा खुला केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच अशा प्रकारे दादागिरी सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आह