पुणे

आजपासून पॉलिटेक्निक प्रवेश : 25 जूनपर्यंत भरता येणार अर्ज

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत तंत्रनिकेतन पदविका (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला आज बुधवार (दि. 29 मे) पासून प्रारंभ होणार असून, 25 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी 2 जुलैला प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने देण्यात आली आहे. यंदाही प्रवेशाच्या तीन फेर्‍या होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात यंदा तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमांसाठी 390 संस्थांमध्ये सुमारे एक लाख पाच हजार इतकी प्रवेशक्षमता आहे. या जागांवर प्रवेश करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेशप्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असून, प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना बुधवारपासून पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज, ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन, छायांकित प्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया करता येणार आहे. दहावीनंतरचे कमी कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी आणि त्यानंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय मानला जातो.

त्यात मुख्यत्वे सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल या मुख्य शाखा आहेत. त्यांच्या इतर सर्व शाखा या मुख्य शाखेच्या अंतर्गत उपशाखा आहेत. विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे शाखा निवडून अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेशप्रक्रिया असणार आहे. पदविका प्रवेशासाठीचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेशप्रक्रियेचा तपशील, माहितीसाठी तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या  https:///dte.mahara shtra.gov.in  या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंदा असलेले बदल

  • एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या 10 टक्के जागा आरक्षित असणार
  • थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी वर्किंग प्रोफेशनलकरिता स्वतंत्र तुकडी असणार
  • थेट द्वितीय वर्षासाठीच्या प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमाची शाखा बारावीच्या विषयानुसार निवडता येणार.
  • केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेच्या तीन फेर्‍या होणार
  • छाननी प्रक्रियेव्यतिरिक्त ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार
  • दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी 316 सुविधा केंद्रे
  • मार्गदर्शनासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल अधिकारी

असे आहे वेळापत्रक

  • प्रवेशासाठी अर्ज करणे – 29 मे ते 25 जून
  • प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी – 29 मे ते 25 जून
  • प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे – 27 जून
  • तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप – 28 ते 30 जून
  • अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे – 2 जुलै

हेही वाचा

SCROLL FOR NEXT