नितीन शेळके
आळेफाटा : राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरी जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी होणे अशक्य आहे. त्यामुळे आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनावणे यांच्या नेतृत्वात खरी लढत होणार आहे. भाजप आशाताई बुचके यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुकीत उतरणार आहे.
आळे-पिंपळवाडी व राजुरी-बेल्हे जिल्हा परिषद गटावर आमदार अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. पिंपळवाडी, राजुरी व बेल्हे पंचायत समिती गटातही राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आळे गट शिवसेनेकडे आहे. सर्व दृष्टीने सक्षम उमेदवारी कोणाला देता येईल याची प्रमुख नेत्यांकडून चाचपणी होत आहे. निवडणूक आयोग गट व गण रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करेल. नव्याने वाढत असलेल्या दोन गटांमुळे आळे-पिंपळवाडी व राजुरी-बेल्हे जिल्हा परिषद गटात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. याचा फटका प्रस्थापित राजकीय मंडळींना बसू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद सात गट आणि पंचायत समितीचे चौदा गण आहेत. या वर्षी गट गणांची पुनर्रचना होणार असल्याने तालुक्यात आणखीन दोन गट वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तालुक्यात नव्याने 9 गट व 18 गण होणार आहे. नवीन वाढणार्या गटामुळे पूर्वीच्या सर्व गटातील काही गावांची तोडफोड होणार असल्याने नवीन गट निर्मितीमुळे तूर्त तरी अनेक नेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, कच्चा प्रारूप आराखडा तयार करून तहसील कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. पुणे जिल्हा परिषदेचा गट व गणाचा कच्चा मसुदा सादर करण्यासाठी राज्य निवडणूक विभागाने 10 फेब्रुवारीपर्यंत सादरीकरणाची मुदत दिली आहे. त्यानंतर निवडणूक विभागाकडून त्यात काही बदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
प्रशासन नेमके गट दक्षिणेकडून सुरू करते की, उत्तर दिशेने सुरू करते यावरच गट कोणता निर्माण होईल? हे कळेल. तसेच नवीन गटांमुळे गावे कमी होणार असल्याने उमेदवारांचा प्रचाराचा ताण काहीसा कमी होईल. भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार असल्याचा अंदाज बांधत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गट-गणात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
महिलांचे मोठं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी भाजपचा झेंडा हाती धरल्याने महाविकास आघाडीतील पक्षांना त्याचे मोठे आवाहन असणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने आघाडी करून निवडणूक लढवली तर बंडखोरांचे बंड थोपवण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस नेत्यांना पेलावे लागणार आहे.
https://youtu.be/gfZJcopVz0g