जुन्नर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग  File Photo
पुणे

Local Bodies Election: जुन्नर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग

सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानंतर इच्छुकांची लगीनघाई

पुढारी वृत्तसेवा

सुरेश वाणी

नारायणगाव: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, असे आदेश सर्वेाच्च न्यायालयाने दिल्यानंतर जुन्नर तालुक्यातील राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. या निर्णयानंतर इच्छुक मंडळींची लगीणघाई सुरू झाली असून त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडे फेर्‍या वाढू लागल्या आहेत.

जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मजबूत आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत अतुल बेनके यांचा पराभव झाल्याने या पक्षाची ताकद काही प्रमाणात कमकुवत झाली आहे. अपक्ष विजयी झालेले आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेशी घरोबा केला आहे.

परंतु या पक्षाची तालुक्यात फारशी ताकद नाही. आशाताई बुचके भाजपात गेल्याने या पक्षाला तालुक्यात तरतरी आहे. परंतु पक्षाची ताकद तालुक्यात म्हणावी अशी नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत या पक्षाला फारच मेहनत घ्यावी लागेल.

जुन्नर तालुक्यात काँग्रेसची ताकद फारशी नाही. या पक्षाचे युवा नेते विघ्नहरचे अध्यक्ष विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात गेले. त्यामुळे काँग्रेस पक्ष सध्या जुन्नर तालुक्यात नावापुरता राहिला असल्याचे दिसून येत आहे. (latest pune news)

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला माणणारे कार्यकर्ते जुन्नर तालुक्यात अधिक आहे. परंतु याचे रूपांतर मतात होणे अपेक्षित आहे. या पक्षाचे तालुक्यात नेते जर सक्रिय झाले तर निवडणुकीत रंगत आणू शकतात.

शिवसेने (उबाठा)ची ताकद तालुक्यात मजबूत आहे. परंतु पक्ष फाटाफुटीनंतर या पक्षाचे कार्यकर्तेही फारसे सक्रिय दिसत नाही. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका युती व आघाडी करून लढावीणार की सगळे पक्ष वेगवेगळे लढणार ? पक्षाच्या नेत्यांचा आदेश काय येतोय हे देखील महत्वाचे असणार आहे.

जुन्नर नगरपरिषद, जुन्नर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका पुढ्यात आहेत. या स्थानिक संस्थावर प्रशासक असल्याने सामान्य जनतेची कामे मोठ्या प्रमाणात रेंगाळली आहेत. संबंधित संस्थेचे प्रमुखच त्या संस्थेवर प्रशासक म्हणून नियुक्त केल्याने सामान्य लोकांची कामे तातडीने मार्गी लागत नाहीत.

या संस्थावर सदस्य नसल्याने तक्रार कोणाकडे करायची? असा प्रश्न या जनतेला आहे. दोन वर्षाहून अधिक काळ या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात होत्या. आता कोर्टाचे फर्मान आल्याने सगळेच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करू लागले आहेत. जुन्नर नगरपरिषदेवर यापूर्वी शिवसेनेची सत्ता होती.

शाम पांडे हे सेनेचे नगराध्यक्ष होते. परंतु सध्या दोन शिवसेना झाल्याने या निवडणुकीत दोघांनाही कसरत करावी लागणार आहे. अपक्ष आमदार शरद सोनवणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले असले तरी या संस्थेत सत्ता मिळविण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. जुन्नर नगर.परिषदेत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त नगरसेवक निवडून आले होते.

आता राष्ट्रवादी एकसंघ न राहिल्याने या दोन्ही पक्षांना खूप कसरत करावी लागणार आहे. दरम्यान जुन्नर पंचायत समितीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकहाती होती. या निवडणुकीत कोणता पक्ष कोणाबरोबर युती व आघाडी करील यावर पुढील गणित अवलंबून असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT