

पुणे: शासकीय रुग्णालयांमध्ये गरीब आणि गरजू रुग्ण मोफत उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होतात. रुग्णालयात दाखल होण्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत रुग्णसेवेमध्ये डॉक्टरांच्या बरोबरीने परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील हजारो पदे रिक्त असल्यामुळे रुग्णसेवेवर विपरित परिणाम होत आहे.
पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयासह राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये दररोज दीड ते दोन हजार रुग्ण उपचारांसाठी येतात. यापैकी आंतररुग्ण विभागामध्ये दाखल होणार्यांची संख्या सुमारे 800 ते 1000 इतकी असते. (Latest Pune News)
प्रत्येक पाच रुग्णांमागे एक परिचारिका असणे अपेक्षित असताना सद्य:स्थितीत एक परिचारिकेकडे 15 ते 20 रुग्णांची जबाबदारी सोपवल्याचे पाहायला मिळत आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिकांकडून उर्मट वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी बरेचदा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त होत असतात.
अशा वेळी परिचारिकांना पूर्णपणे दोषी धरले जाते. मात्र, ‘परिचारिका या रोबो नव्हेत, माणूसच आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील कामाच्या ताणाचा व्यवस्थापनाकडून विचार व्हावा’, अशी मागणी परिचारिका संघटनांकडून सातत्याने केली जात आहे.
आकडे काय सांगतात?
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात गट-ब, गट-क आणि गट-ड या संवर्गांमध्ये एकूण 54,954 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या 11,375 पदे रिक्त आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांंशी संलग्न रुग्णालयांमध्ये एकूण 35,343 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 9088 पदे रिक्त आहेत. यामध्ये परिचारिकांची संख्या लक्षणीय आहे.
उपलब्ध मनुष्यबळावर येतोय ताण
परिचारिकांची अनेक पदे रिक्त असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा प्रचंड ताण येत आहे. विशेषत:, रात्रीच्या वेळी रुग्णसेवेमध्ये अनेक अडचणी येत असल्याचे परिचारिकांचे म्हणणे आहे. रुग्ण आजारपणामुळे आधीच चिडचिडे, हतबल झालेले असतात. अशा वेळी परिचारिकांकडून वेळेवर प्रतिसाद न मिळाल्यास रुग्ण आणि नातेवाईक यांचा राग अनावर होतो.
कोणतीही परिचारिका रुग्णांना जाणीवपूर्वक दुखावत नाही. मात्र, कामाचा भार सोसताना त्यांची काही प्रमाणात चिडचिड होते. परिचारिका वेळच्या वेळी स्वत:मध्ये सुधारणा करतातच; मात्र, शासनाने उपलब्ध मनुष्यबळावरील ताण कमी करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी भावना शासकीय रुग्णालयातील एका परिचारिकेने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.
रात्रपाळीला वर्ग - 4 चे कर्मचारी नसतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्ण आला तर अडचण येते. एका वॉर्डात 80-90 रुग्ण तर त्यांच्यासाठी केवळ 2-3 परिचारिका असतात. त्यामुळे रुग्णांची स्वच्छता, चहा करून देणे वगैरे कामेही परिचारिकांना करावी लागतात. याआधीची परिस्थिती आणखी गंभीर होती. मात्र, अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार आणि मेट्रन विमल केदार यांच्याकडून सहकार्य लाभत असल्याने परिचारिकांवरील ताण काहीसा कमी झाला आहे.
- प्रज्ञा गायकवाड, कार्याध्यक्ष, नर्सेस असोसिएशन, पुणे शाखा