धमकावून पैसे उकळणारे पोलिस निलंबित; मैत्रिणीसोबत बोलत थांबलेल्या व्यक्तीकडून पैसे घेतल्याचे प्रकरण  file photo
पुणे

Pune News: धमकावून पैसे उकळणारे पोलिस निलंबित; मैत्रिणीसोबत बोलत थांबलेल्या व्यक्तीकडून पैसे घेतल्याचे प्रकरण

डेक्कन पोलिस ठाण्यातील दोघा पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: लॉ कॉलेज रोड दामले पथ डेक्कन परिसरात मैत्रिणीसोबत चारचाकी गाडीत बोलत थांबलेल्या व्यक्तीला धमकावून वीस हजार रुपये उकळण्याच्या आरोपावरून डेक्कन पोलिस ठाण्यातील दोघा पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

गणेश तात्यासो देसाई आणि योगेश नारायण सुतार अशी दोघांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. याबाबत वारजे येथील एका 47 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. (Latest Pune News)

कोंढवा पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍याचा बोपदेव घाटातील लुटीचा प्रकार ताजा असतानाच, आता डेक्कन पोलिस स्टेशनच्या दोघा कर्मचार्‍यांनी एटीएममध्ये जाऊन 20 हजार रुपये उकळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर यापूर्वी येरवडा पोलिस ठाण्यातील दोघा पोलिसांनी अशाच प्रकारे तरुणाल धमकावून पैसे उकळण्याचा प्रकार केला होता.

पोलिस कर्मचारी देसाई मंगळवारी रात्री 9 ते बुधवारी सकाळी 9वाजेपर्यंत सीआर मोबाईल वाहनावर चालक म्हणून तर सुतार हे बालगंधर्व बीट मार्शल म्हणून कर्तव्यावर होते. तक्रारदार हे त्यांच्या मैत्रिणीसोबत लॉ कॉलेज रोड दमलेपथ येथे त्यांची चारचाकी गाडी पार्क करून थांबले होते. त्यावेळी हे दोघे पोलीस तेथे आले.

या भागातून एक तक्रार आली आहे पैसे द्या असे म्हणून 20 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार एवढे पैसे का? असे विचारले त्यावेळी पोलिसांनी तक्रारदाराला पोलिस चौकीला चला असे म्हटले. त्यामुळे तक्रारदार घाबरले. त्यांनी वीस हजार रुपये देण्याचे कबूल केले. पोलिस कर्मचारी देसाई हे तक्रारदाराला आपल्या दुचाकीवर बसवून कमलानेहरु पार्क जवळील एटीएम सेंटरमध्ये घेऊन गेले. तेथे पोलिसाने त्यांच्याकडून वीस हजार रुपये घेतले.

हा प्रकार घडल्यानंतर तक्रारदाराने आणि त्यांच्या मैत्रिणीने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली होती. चौकशीनंतर या दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांचा कसुरी अहवाल डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोलीस उपायुक्तांकडे पाठविला होता.

त्यानंतर या दोघांचे निलंबन करण्यात आले आहे. तक्रारदार यांच्याकडे या दोघा पोलिसांनी, ज्या कायद्याच्या उल्लंघनासाठी विचारणा केली होती. त्याबाबत कायदेशीर कारवाई करणे आवश्यक होते.

तसेच वरिष्ठांना याबाबत माहिती देणे गरजेचे होते. परंतु दोघे पोलिसांनी केलेल्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवत. या दोघांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT