

पुणे: भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत अभियंता तरुणीचा मृत्यू झाला, तर तिची सहप्रवासी मैत्रीण जखमी झाली आहे. तेजल तायडे (वय 27, रा. तलासरी, जि. ठाणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.
अपघातात प्राची जगन्नाथ पाचंगे (वय 28, रा. डांगे चौक, थेरगाव) जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेजलचा मृत्यू झाला, त्याच दिवशी तिचा वाढदिवस होता. (Latest Pune News)
याप्रकरणी डंपरचालक राहुल भीमराव राठोड (वय 24, रा. भोंडवेवस्ती, रावेत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. याबाबत प्राची पाचंगे हिने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 19) रात्री साडेबाराच्या सुमारास गणेश दत्त मंदिर चौकातून ज्युपिटर हॉस्पिटलकडे जाणार्या रस्त्यावर घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजल ही आयटी अभियंता म्हणून ठाण्यातील कंपनीत काम करते. 16 जूनपासून कामानिमित्त ती पुण्यात आली होती. गुरुवारी तिचा वाढदिवस होता. त्यानिमित्त मैत्रीण प्राचीसोबत हायस्ट्रीट परिसरात जेवणासाठी हॉटेलमध्ये आली होती. जेवण झाल्यानंतर केक घेऊन दोघी घराकडे निघाल्या होत्या.
तेजल दुचाकी चालवत होती, तर प्राची पाठीमागे बसली होती. गणेश दत्त मंदिर चौक ते ज्युपिटर हॉस्पिटल रस्त्याने दोघी दुचाकीवरून जात असताना भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. अपघातात तेजल गंभीर जखमी झाली. तेजल आणि प्राचीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तेजलचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
डंपरचालक राठोड याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक केकाण तपास करीत आहेत. शहर परिसरातील प्रमुख रस्त्यांवर डंपर, सिमेट मिक्सर, ट्रक अशा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. आदेश धुडकाविणार्या अवजड वाहनांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
शहर परिसरात गंभीर अघघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अवजड वाहनांच्या वेगामुळे गंभीर अपघात घडले आहेत. शहर परिसरात गेल्या महिनाभरात वेगवेगळ्या भागांत 14 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मार्केट यार्डातील गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आठवडाभरापूर्वी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी नियम मोडणार्या अवजड वाहनांविरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.