पुणे

पुणे : अवैध धंद्याविरोधातील फ्लेक्स लावण्यास पोलिसांची मनाई!

अमृता चौगुले

येरवडा : पुढारी वृत्तसेवा

अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस आयुक्तांना दिलेला अर्जाचाच बॅनर तयार करून लावत असताना विश्रांतवाडी पोलिसांनी हा बॅनर लावण्यास मनाई केली. अवैध धंद्यांकडे नागरिकांचे, पोलिसांचे केवळ लक्ष वेधण्यासाठी आपण हा फ्लेक्स लावत होतो; मात्र पोलिसांनी तो लावू दिला नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब मोरे यानी सांगितले.

भाजपचे कार्यकर्ते असलेल्या मोरे यांनी विश्रांतवाडी, येरवडा, विमाननगर व चंदननगर हद्दित अवैध धंदे सुरु असून, ते बंद करावेत यासाठी पोलिस आयुक्ताना दि. २८ फेब्रुवारी रोजी मटका चिठ्ठीच्या पुराव्यासह निवेदन दिले आहे. या निवेदनाचा आणि मटका चिठ्ठीचा बॅनर बनवून त्यावर अमिताभ बच्चन यांच्या छायाचित्रासह मेसेज देणारा फेलक्स बनवला. हा फ्लेक्स शांतीनगर कॉर्नर याठिकाणी मंगळवारी रात्री लावत होते. याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. तातडीने पोलीस जागेवर आले आणि फ्लेक्स लावण्यास मनाई केली. यावेळी पोलिस आणि मोरे यांच्यात बाचाबाची झाली.

याबाबत बोलताना भाऊसाहेब मोरे म्हणाले, परिसरात अवैध धंदे वाढले असून, अनेक कुंटुबे उध्वस्त झाली आहेत. महिला धूणी भांडी करतात; तर पुरूष जुगारी, व्यसनी झाले आहेत. अवैध धंदे बंद करण्यासाठी आपण पोलिस आयुक्ताना अर्ज दिला आहे. त्याच अर्जाचा बॅनर बनवून लावत असताना पोलिसांनी दमदाटी करून बॅनर काढायला लावला. मी दिलेल्या अर्जानुसार तरी पोलिसांनी कार्रवाई करावी.

यासंदर्भात विश्रांतवाडीचे पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते म्हणाले, हद्दितील सर्व अवैध धंदे बंद आहेत. मोरे यानी आयुक्त कार्यालयात दिलेला तक्रार अर्ज अद्याप आमच्याकडे आलेला नाही. अर्ज आल्यावर कार्रवाई केलीच जाईल; मात्र असा अनाधिकृत बैनर लावणे योग्य नसल्याने त्यांना बँनेर लावण्यास मनाई केली.

SCROLL FOR NEXT