पुणेः मला चव्हाण साहेबांनी पाठवलंय. तुम्हाला हॉटेल चालू ठेवण्यास कोणी परवानगी दिली? मला सांगितलंय, हॉटेल बंद करून घ्यायला. मी अजून व्हिडीओ शूटिंग त्यांना पाठवलेलं नाही. तुमचे वरिष्ठ कोण आहेत? त्यांना मला उद्या भेटायला सांगा.
तुम्ही जर माझं काम केलं तर मी तुमचं काम करतो. नाहीतर माझ्याशी गाठ आहे, अशी दमबाजी खराडी पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाने (फौजदार) केली. तसेच कारवाई करण्याचा धाक दाखवून हॉटेल व्यवसायिकाकडून दहा हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. (Latest Pune News)
दिनांक : 8 ऑगस्ट.. वेळ : रात्रीचे बारा वाजून 17 मिनिटे अठरा सेकंद. ठिकाण : खराडी येथील मिकाची कल्ब हॉटेल. एक पोलिस उपनिरीक्षक अंमलदारासोबत हॉटेलमध्ये घुसतात आणि थेट मोबाईल काढून शुटिंग सुरू करतात. अंमलदाराने वर्दीवर जॅकेट परिधान केले आहे. फौजदारसाहेब म्हणतात, मला चव्हाण साहेबांनी पाठवलयं. तुमचे हॉटेल बंद करायला. तुम्ही एक काम करा.
मी केलेले व्हिडीओ शुटींग चव्हाण साहेबांना पाठवत नाही. तुम्ही तुमचे कोण सिनियर आहेत. त्यांना मला उद्या भेटायला सांगा. असा आदेश सोडत फौजदारसाहेब तेथून निघून गेले. मॅनेजरने हा सर्व प्रकार आपल्या व्यवस्थापकाच्या कानावर घातला. हॉटेलच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने दुसर्या दिवशी दुपारी सदर फौजदार साहेबांना फोन लावला.
तिकडून फौजदारसाहेब म्हणाले, ऑफिसला आलो की फोन करतो. सायंकाळी ऑफिसला आल्यानंतर त्यांनी हॉटेल वरिष्ठ व्यवस्थापकाला फोन करून बोलावून घेतले. त्यानुसार सायंकाळी सव्वासहा वाजता ते पोलिस ठाण्यात गेले. पाहा, तुम्हाला तर सगळं माहिती आहे. तुम्ही माझे काम करा, मी तुमचे काम करतो.
त्यानंतर व्यवस्थापक खराडी पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. रात्री साडेआठ वाजता खराडीतील वल्डट्रेड सेंटरच्या समोरील गेट क्रमांक एक येथे फौजदारसाहेब आले आणि मॅनेजरकडून दहा हजार रुपये घेऊन गेले, अशी माहिती दैनिक ‘पुढारी’शी बोलताना हॉटेलच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने दिली.
फौजदारसाहेब, पोलिस आयुक्त काय म्हणतात... ते पहा
फौजदारसाहेबांनी हॉटेलमध्ये प्रवेश करताच, मोबाईलद्वारे व्हिडीओ शुटिंग सुरू केले. कदाचित त्यांना पोलिस आयुक्तांनी हॉटेल संदर्भात काढलेली नियमावली आणि शहरातील आस्थापनांचा कालावधी याचा कदाचित विसर पडला असावा.
आयुक्त साहेबांनी काढलेली नियमावली सांगते, मनोरंजनासाठी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकांना त्रास नको अपवादात्मक परिस्थिती सोडता, पोलिस सतत आस्थापनामध्ये प्रवेश करणार नाहीत. नियमभंग केल्याची कारवाई करायचे झाल्यास पोलिस मॅनेजरला बाहेर बोलावून घेतील. त्यानंंतर दीड वाजताची आस्थापना बंद करण्याची वेळ झाल्यानंतर करवाई करतील. त्याचबरोबर आस्थापनांना बंद करण्याचा कालावधी याचे स्पष्ट निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावलीत दिले आहेत.
दै.‘पुढारी’चे खडे सवाल
हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री दीडवाजेपर्यंत परवानगी आहे. कोणताही कॉल किंवा तक्रार नसताना फौजदारसाहेब तेथे का गेले?
हॉटेलमध्ये काही गैरप्रकार सुरू होता तर त्यांनी कारवाई का केली नाही?
खराडी पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांचेनाव सांगून मॅनेजरला धमकावले, पण प्रभारी अधिकारी म्हणतात, आम्ही असे कोणते आदेश दिले नव्हते. हॉटेलमध्ये ग्राहक कुटुंब,मित्र-मैत्रिणीसह जेवण करत असताना फौजदारसाहेबांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण कोणत्या नियमात केले?
पोलिस आयुक्तांची हॉटेल व इतर आस्थापनाच्या संदर्भात नियमावली असतानादेखील फौजदाराने उल्लंघन का केले?
दुसर्या दिवशीदेखील फौजदाराने वल्ड ट्रेड सेंटरसमोर का भेट घेतली?
हॉटेलमध्ये गैरप्रकार निदर्शनास आला होता का? जर तसे असेल तर त्यांची कल्पना वरिष्ठांना का दिली नाही ?
कर भरून नियमाने व्यवसाय करणार्यांचा असा छळ होत असेल तर ते योग्य आहे का?
या प्रकाराची आम्ही माहिती घेतो...
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर दैनिक ‘पुढारी’ने खराडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, आस्थापना बंद करण्याचे नियम आहेत. हॉटेल रेस्टॉरंटला रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी आहे. जे अधिकारी मिकाची क्लबमध्ये रात्री सव्वाबारा वाजता गेल्याचे समजते आहे. त्यांना आम्ही हॉटेल बंद करण्याबाबत सांगितले नव्हते. या प्रकाराची आम्ही माहिती घेतो.