पुणे

पुणे : खाक्या दाखवताच वृद्धाला परत मिळाले हक्काचे पाच लाख

अमृता चौगुले

अशोक मोराळे

पुणे : नाव- गणेश राव… वय वर्षे नव्वद… मुक्काम राजाजीनगर, बंगळूर. लढण्याची तीव्र चिकाटी… त्यामुळे या वयातही उत्साह तरुणाईला लाजवेल असा; पण एका फायनान्स कंपनीने फसवले आणि मग पुन्हा सुरू झाला या वयातही लढा! त्यांच्या या लढ्याला पोलिसी खाक्यानेही बळ दिले अन् कष्टाची पाच लाखांची पुंजी त्यांना परत मिळाली.

कंपनीची पैसे देण्यास टाळाटाळ

आयुष्याच्या संध्याकाळी मुले- नातवंडावर भार न टाकता आपल्या उदरनिर्वाहासाठी राव यांनी एका खासगी फायनान्स कंपनीत पाच लाख रुपये गुंतविले होते, परंतु मुदतीनंतरही कंपनी पैसे परत देण्यास टाळाटाळ करत होती. शेवटी त्यांनी पत्राद्वारे पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाशी संपर्क साधला. त्यांनीही गणेश रावांना साथ देत त्यांचे कंपनीने दडवून ठेवलेले पाच लाख रुपये दोन दिवसांत मिळवून दिले. चार वर्षांपासून पैशांची वाट पाहणार्‍या राव यांनी खात्यात पैसे जमा झाल्याचा संदेश पाहताच पुणे पोलिस ग्रेट असल्याची भावना व्यक्त केली.

राव त्यांच्या कुटुंबीयांसोबत बंगळूर येथील राजाजीनगरमध्ये राहतात. 2015 साली त्यांनी एका एजंटच्या माध्यमातून लक्ष्मी रोड पुणे येथे मुख्य कार्यालय असलेल्या खासगी फायनान्स कंपनीत पाच लाख रुपयांची एफडी केली. निर्धारीत नियमानुसार 2017 साली त्यांना ते पैसे कंपनीने देणे बंधनकारक होते. मात्र, तसे झाले नाही. गेल्या चार वर्षांपासून राव पैसे मिळविण्यासाठी कंपनीसोबत संपर्क साधत होते.
पैसे वृद्धापकाळाच्या शेवटी मिळत नसल्याचे पाहून राव नैराश्यात गेले होते.

स्पीड पोस्टाने ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे तक्रार

दरम्यान, राव यांना ज्येष्ठ नागरिक कक्षाची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळाली. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी स्पीड पोस्टाने तक्रार अर्जाद्वारे ज्येष्ठ नागरिक कक्षाशी संपर्क साधला आणि कैफियत मांडली. या वेळी राव यांनी फायनान्स कंपनीचा एक संपर्क क्रमांकदेखील अर्जात दिला होता. पोलिसांनी त्यावर संपर्क साधला. मात्र, तो बंद असल्याचे आढळले. त्यानंतर भरोसा सेलकडील कर्मचार्‍यांनी याची माहिती विश्रामबाग पोलिसांना देऊन कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत संपर्क साधला. राव यांनी केलेल्या तक्रार अर्जाच्या बाबतीत चौकशी केली असता, त्यांची पाच लाख रुपयांची एफडी असल्याचे तेथील अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, मूळ पावती राव यांच्याकडून मिळत नसल्याचे कारण सांगून एफडीची रक्कम दिली नसल्याचे म्हटले. पोलिसांनी कंपनीच्या अधिकारी व राव यांच्या मुलाला सांगून एफडीची मूळ पावती कंपनीला पाठवण्यास सांगितले. पावती मिळाल्यानंतर कंपनीने पाच लाख रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले.

ज्येष्ठ नागरिक कक्ष काय करतो?

ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या माध्यमातून शहरातील ज्येष्ठांना पोलिसांकडून मदतीचा हात दिला जातो. त्यांच्या समस्या सोडविल्या जातात. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कामकाज चालते. शहरातील ज्येष्ठांबरोबरच थेट बंगळूरच्या व्यक्तीला मदत केल्याचे समाधान येथील अधिकार्‍यांना आहे.

गणेश राव यांनी पोस्टाद्वारे ज्येष्ठ नागरिक कक्षाशी संपर्क साधून एफडीचे पैसे मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यानुसार संबंधित फायनान्स कंपनीसोबत संपर्क साधून त्यांचे पैसे परत मिळवून देण्यास मदत केली.

योगिता बोडखे, सहायक पोलिस निरीक्षक

चार वर्षांपासून एफडीचे पैसे मिळत नव्हते. पोस्टाद्वारे माझी तक्रार प्राप्त होताच, अवघ्या दोन दिवसांत माझे एफडीचे पैसे मिळवून देण्यास पोलिसांनी मदत केली आहे. त्यांचे काम ग्रेट आहे.

गणेश राव, ज्येष्ठ नागरिक (बंगळूर)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT