पुणे : नवले पूल परिसरात सातत्याने घडणारे अपघात कमी करण्यासाठी आणि जड वाहने शहराबाहेर वळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यायी रस्त्यांची पाहणी केली. या पाहणीमध्ये पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या वतीने बांधकाम करण्यात अंतर्गत रिंगरोड सर्वात व्यवहार्य पर्याय ठरत असून, लवकरच या कामाला गती देण्याची तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
जांभूळवाडी येथून थेट मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील गहुंजे स्टेडियमपर्यंत नवीन मार्ग तयार झाल्यास नवले पूलावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा प्रशासनाचा निष्कर्ष आहे. या संदर्भात येत्या दोन दिवसांत महत्त्वाची बैठक होऊन पुढील नियोजन ठरवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. नवले पूलावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग (एनएचआय) आणि इतर संबंधित विभाग सतर्क झाले आहेत. या स्थितीत अंर्तगत रिंगरोड हा तातडीने अंमलात आणता येणारा ठोस उपाय असल्याचे भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या पीएमआरडीएकडून अंतर्गत रिंगरोड आणि एमएसआरडीसी मार्फत आउटर रिंगरोड असे दोन रिंगरोड बांधले जाणार आहेत. नवले पुलाजवळून एमएसआरडीसीचा आउटर रिंगरोड जाणार असला तरी तो भूमिगत स्वरूपात असल्याने त्याच्या अंमलबजावणीत विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याउलट, पीएमआरडीएचा रिंगरोड जांभूळवाडी-गहुंजे स्टेडियममार्गे सुमारे 40 किमीचा सरळ जोड तयार करू शकतो आणि त्याचे काम तुलनेने जलद गतीने पूर्ण होऊ शकते.
पीएमआरडीएचा संपूर्ण रिंगरोड सुमारे 80 किमी लांबीचा आहे. ज्या गावांतून हा मार्ग जातो त्याठिकाणी जमिनींची मोजणी पूर्ण झाली आहे. तीन गावातील भूसंपादन दर निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित गावांचे दर एका महिन्यात अंतिम होतील. या आठवड्यातच याबाबतची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे रिंगरोड प्रकल्पाची गती वाढवून नवले पूलावरील वाहतूक समस्येवर तो प्रभावी उपाय ठरू शकतो.जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी