PMPML Pudhari
पुणे

PMPML Revenue Growth: तोट्यातील पीएमपीएमएलला सुधारणांचा डोस; चार वर्षांत उत्पन्नात १२० टक्के वाढीचा प्रशासनाचा दावा

सहा हजार बसांची गरज, सध्या केवळ १,९६४ बस उपलब्ध; दोन हजार नव्या बस, स्मार्ट बसथांबे आणि १२,९०० कोटींच्या आराखड्याने सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पीएमपीएमएल तोट्यात असली तरी सेवा सुधारण्यासाठी व्यापक पावले उचलली जात असून, गेल्या चार वर्षांत उत्पन्नात तब्बल १२० टक्क्यांची वाढ झाली आहे. शहराला आवश्यक असलेल्या सहा हजार बसच्या तुलनेत सध्या केवळ १,९६४ बस उपलब्ध असून, पुढील काळात दोन हजार नव्या बस ताफ्यात दाखल होणार आहेत. ब्रेकडाऊन रोखण्यासाठी कडक यंत्रणा, ठेकेदारांकडून ४१ कोटींचा दंड, स्मार्ट बसथांबे आणि डिजिटल सेवांसह सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी १२,९०० कोटी रुपयांचा दीर्घकालीन आराखडा तयार करण्यात येत आहे. आमच्यात अनेक त्रुटी असून, काम करण्यास आम्हाला संधी द्यावी, अशी मागणी पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी बुधवारी महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत दिली.

महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत पीएमपीएमएलवर नगरसेवकांनी केलेल्या टीका-टिप्पणीला उत्तर देताना अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी पीएमपीएमएलची सविस्तर बाजू मांडली. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही नफा कमावण्यासाठी नसून, नागरिकांना सेवा देण्यासाठी असल्याचे स्पष्ट करत, उत्पन्नात लक्षणीय वाढ, बससेवेत सुधारणा आणि कार्यक्षमतेत वाढ झाल्याचा दावा त्यांनी आकडेवारीसह केला.

आव्हाड म्हणाले, पीएमपीएमएलचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांसह नियमित बसने प्रवास करून प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला. नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांमुळे विविध भागांतील वास्तव समजण्यास मदत झाली असून, त्या गांभीर्याने घेतल्या जातील. शहराची लोकसंख्या एक कोटी तीन लाखांहून अधिक असून, जागतिक निकषानुसार किमान सहा हजार बसची गरज आहे. मात्र, सध्या पीएमपीएमएलकडे १,९६४ बस असून, त्यापैकी १,३०६ भाडेतत्त्वावरील तर ६५८ स्वतःच्या आहेत. पुढील काळात केंद्र शासनाकडून एक हजार इलेक्ट्रिक आणि यावर्षी एक हजार सीएनजी बस ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आर्थिक स्थितीबाबत बोलताना त्यांनी २०२१-२२ मध्ये ३७२ कोटी रुपये असलेले उत्पन्न २०२५-२६ मध्ये ८१८ कोटी रुपयांवर पोहोचल्याने तब्बल १२० टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले. त्याच काळात खर्च १,०९१ कोटींवरून १,६१० कोटी रुपयांपर्यंत गेला असला तरी वाढ केवळ ४७ टक्के असल्याचा दावा त्यांनी केला. कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधन, देखभाल आणि भाडेतत्त्वावरील बस यांवरच बहुतांश खर्च होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पीएमपीएमएलचे तिकीट आणि पासमधून ७२० कोटी, तर जाहिराती व इतर स्रोतांमधून ९८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती देत, उत्पन्न सातत्याने वाढत असल्याचे आव्हाड यांनी नमूद केले. बससेवा पूर्णपणे निकृष्ट असल्याचा आरोप योग्य नसून, अनेक कार्यक्षमतेच्या निकषांवर सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेकडाऊनचे प्रमाण चिंतेचा विषय

अपघातांचे प्रमाण प्रतिएक लाख किलोमीटरमागे लक्षणीयरीत्या घटले असले तरी ब्रेकडाऊनचे प्रमाण अद्याप चिंतेचा विषय असल्याची कबुली व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी दिली. उपलब्ध संसाधनांचा अधिकाधिक वापर करून रस्त्यावर धावणाऱ्या बसांची संख्या आणि शेड्यूल वाढविण्यात यश आल्याचा दावा करत, पीएमपीएमएलमधील त्रुटी दूर करण्यासाठी टप्प्याटप्प्याने सुधारणा सुरू असल्याचे त्यांनी सभागृहाला आश्वस्त केले.

प्रशासन कटिबद्ध

२०३४ पर्यंत आठ हजार बसचा ताफा उभारण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी डेपो, टर्मिनल, चार्जिंग स्टेशन आणि इतर पायाभूत सुविधांसह १२,९०० कोटी रुपयांचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. "नगरसेवकांनी उपस्थित केलेले प्रश्न योग्य आहेत. उणिवा दूर करून पीएमपीएमएलला अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवाशाभिमुख करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे," असे सांगत व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी सभागृहाला सुधारणा प्रक्रियेची ग्वाही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT