PMPML Bus Pudhari
पुणे

PMPML Bus SOP: पीएमपीची कडक कारवाईची तयारी; खासगी बस कंत्राटदारांसाठी नवी SOP

नियमभंग केल्यास करारानुसार कारवाई; प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे: पीएमपी ताफ्यातील खासगी कंत्राटदारांच्या बसचा विस्कळीत कारभार आणि वाढत्या अपघातांची दखल घेत, पीएमपी प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी खासगी बस कंत्राटदारांसाठी नवीन एसओपी (प्रमाणित कार्यप्रणाली) जारी केली असून, नियमांचे उल्लंघन केल्यास करारानुसार करण्यात येणार आहे.

पीएमपीएमएलच्या ठेकेदारांकडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराबद्दल दैनिक ‌‘पुढारी‌’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते, त्याची दखल घेत पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी तातडीने ठेकेदारांसाठी नवीन प्रमाणित नियमावली जारी केली. आणि तिचे कडक पालन करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

याशिवाय या नियमावलीचे सात दिवसांत अंमलबजावणी करा, असे देखील त्यांनी ठेकेदारांना बोलावून सांगितले आहे. नियमावलीचे पालन न केल्यास पीएमपीकडील सर्व ठेकेदारांवर करारातील अटी-शर्तीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आव्हाड यांनी सांगितले.

काय आहेत नवे नियम ?

  • कोणतीही बस कोणत्याही परिस्थितीत विनाव्यक्ती सोडता येणार नाही.

  • बस पार्क करताना इंजिन बंद करणे अनिवार्य असून, चावी काढून स्टीअरिंग लॉक लावणे बंधनकारक आहे. अनधिकृत किंवा निर्जन ठिकाणी बस पार्क करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

  • ड्युटीदरम्यान चालकाने बस सोडून जाणे, हा गंभीर गुन्हा मानला जाईल.

  • चालकाकडे वैध लायसन्स, बॅज आणि ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.

  • मद्यपान करून वाहन चालविल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

  • प्रत्येक बसमध्ये ट्रॅकिंग प्रणाली, कॅमेरे आणि अग्निशमन यंत्र कार्यान्वित असणे आवश्यक आहे.

  • आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत असणे बंधनकारक आहे.

  • कंत्राटदाराने प्रत्येक चालकाचा आणि वाहकाचा ड्युटी रोस्टर तयार ठेवणे आवश्यक आहे.

  • तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सवर भर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • या आदेशानुसार, जर एखाद्या कंत्राटदाराच्या बसबाबत चोरी, अनधिकृत वापर किंवा अपघात घडल्यास त्याची 24 तासांच्या आत लेखी माहिती नियंत्रण कक्षाला देणे बंधनकारक आहे. हलगर्जीपणामुळे अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ऑपरेटरवर असेल. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर करारानुसार कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवाशांची आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सर्व खासगी बस कंत्राटदारांनी या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करावी, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. याबाबत आम्ही ठेकेदारांना ही नियमावली दिली असून, त्या नियमावलीप्रमाणे त्यांना कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे न केल्यास करारात ठरल्याप्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल
महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT