पुणे

पुणे : चोरटे जोमात, पीएमपीचे प्रवासी कोमात!

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढत असून, वर्षभरात चोरट्यांनी प्रवाशांचा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. प्रामुख्याने ज्येष्ठ महिलांना चोरट्यांकडून टार्गेट केले जात आहे. चोर्‍यांचे प्रकार वाढले की पोलिस व पीएमपीकडून उपायोजना केल्या जातात. पण काही दिवसांत परिस्थिती जैसे थे असते.

प्रवासादरम्यान महिलांच्या पर्समधील दागिने चोरणे, सोनसाखळी हिसकावणे, बांगड्या कटरने कापणे आणि रोकड चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एक जानेवारी 2021 ते 21 मार्च या कालावधीत बसमध्ये चोरीच्या 55 पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकांनी काही टोळ्यांना जेरबंद केले आहे. मात्र तरी देखील चोर्‍या थांबण्याचे नाव नाही. पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात दिवसाला 1400 बस मार्गावर असतात. त्यामधून दररोज साडेआठ ते नऊ लाख प्रवासी प्रवास करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बस पूर्ण क्षमतेने धावत आहेत. बसमध्ये सकाळी व सायंकाळी मोठी गर्दी असते. त्याच संधीचा फायदा घेत गर्दीच्या मार्गावरील बसमध्ये चोरट्यांकडून चोर्‍या केल्या जात आहेत.

टोळीचे चालते संघटित काम

बसमध्ये चोरी करणार्‍या व्यक्ती संघटितपणे काम करत असल्याचे निदर्शनास येते. महिला देखील या टोळीचा भाग आहेत. ठराविक थांब्यावर बसून ठरलेल्या ठिकाणी ही टोळी चोरी करते. एखाद्या व्यक्तीला चोरी झाल्याचे समजले तरी पोलिसांना चेकिंगदरम्यान ऐवज हाती लागण्याची शक्यता कमी असते. 'पीएमपी'मध्ये चोरी करणार्‍या टोळ्या लांब पल्ल्याच्या मार्गावर गर्दी असलेल्या बसमधील प्रवाशांना 'टार्गेट' करतात. बसमध्ये चढता-उतरताना अंगावरील किंवा पर्समधील दागिने, मौल्यवान ऐवज चोरी करतात. मौल्यवान ऐवज असलेल्या प्रवाशांवर नजर ठेवून संधी मिळताच चोरी केली जाते. चोरीचा ऐवज साखळी पद्धतीने एकमेकांच्या मार्फत पास केला जातो.

कटरच्या साह्याने बांगड्या चोरण्यात तरबेज

पर्स कट करून दागिन्यांची चोरी करणे, पर्स लांबविणे, मंगळसूत्र चोरी करणे अशा घटना घडत असत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून थेट कटरच्या साह्याने महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे चोरटे त्यांच्या कामात एवढे तरबेज आहेत की, काही सेेकंदाच्या आत ते काम करून फरार होतात. ज्येष्ठ महिलांना प्रामुख्याने लक्ष्य केले जाते. बसमध्ये चढताना किंवा उतरताना हात देण्याच्या बहाण्याने थेट हातातील सोन्याच्या बांगडीची चोरी केली जाते.

चोरटे बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची लूट करत असल्याच्या अनेक घटना आमच्या कानावर आहेत. आम्ही अशा घटना रोखण्यासाठी प्रत्येक गाडीत सीसीटीव्हीची व्यवस्था केली आहे. एखादी घटना घडल्यास त्या गाडीतील सीसीटीव्ही फुटेज तत्काळ पोलिसांना दिले जाते. तसेच गाडी प्रवाशांसह जवळच्या पोलिस स्टेशनला नेण्यात येते. गाडीमधील अशा चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांशी समन्वय साधून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
                                         – दत्तात्रय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT