पुणे: पीएमपीच्या चालक-वाहकांनी मार्गावर कार्यरत असताना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, तसेच, बस आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, अन्यथा कडक कारवाई करण्याचे आदेश पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिले आहेत.
बससेवा पुरवताना अनेक चालक-वाहक सेवकांकडून तंबाखू, गुटखा सेवन करून बसमध्ये किंवा रस्त्यावर थुंकण्याच्या अनेक तक्रारी पीएमपी प्रशासनाला आल्या आहेत. या तक्रारी गांभीर्याने घेत, पीएमपी अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली असून, असे काम करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
विशेषत: चालक बस चालविताना तंबाखू, गुटख्याचे सेवन करून खिडकीतून बाहेर थुंकत असल्याचे आढळून आले असून, ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. अशा वर्तनामुळे पीएमपीची प्रतिमा जनमानसात मलिन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पीएमपी अध्यक्षांनी सर्व चालक-वाहकांसह टाइमकिपर, गॅरेज सुपरवायझर, कंट्रोलर, चेकर तसेच आगार व्यवस्थापक यांना हे आदेश दिले आहेत.
त्यांनी मार्गावर बस चालवितांना तंबाखू, गुटख्याचे सेवन करू नये. सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर थुंकू नये. प्रवाशांच्या आरोग्यास हानीकारक ठरेल असे कोणतेही गैरवर्तन करू नये. पीएमपीची प्रतिमा मलिन होईल, असे वर्तन करू नये. आगार व बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवणे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या चालक-वाहक सेवकांवर तसेच खासगी बस ठेकेदाराकडील चालक-वाहक कर्मचारी यांच्यावर एक हजार रूपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
तसेच तक्रारीची गंभीरता पाहून संबंधित सेवकांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात येणार आहे. सर्व आगार व्यवस्थापकांना आपल्या आगारातील सेवकांना तसेच खासगी ठेकेदारांना याबाबत जागृती व प्रबोधन करण्याचे निर्देश दिले आहेत. असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.