पुणे : पुण्यातील एका प्रसिद्ध इन्फ्लूएन्सरने चक्क पीएमपीच्या एका बसमध्येच गाण्याचे शूटिंग केले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, उत्पन्नवाढीतील उपक्रमांचा भाग म्हणून, आता मेट्रो प्रमाणेच पीएमपीतही चित्रपट, गाणी शूटिंग करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता पीएमपी उत्पन्नवाढीसाठी राबवत असलेल्या उपक्रमांमुळे ‘झटपट पटापट लक्ष्मीजी पीएमपीएमएल के तिजोरी के अंदर...’ असणार आहे.
पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या एका इन्स्ट्राग््रााम इन्फ्लूएन्सएरने शक्कल लढवत, सध्या चर्चेत असलेले ‘झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर’ हे व्हिडीओ गाणे शूट केले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठा व्हायरल होत असून, पीएमपी बसमध्ये रात्रीच्या वेळी केलेल्या शूटमुळे याची खूपच चर्चा होत आहे. इन्फ्लूएन्सरने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून हा व्हिडीओ व्हायरल केला आहे.
त्याला हजारो लोकांनी पाहिला आहे. या शूटींगसाठी पीएमपीएमएलने परवानही दिली असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे. पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शुटींगला दिलेली बस, ही स्वारगेट आगाराची होती. रात्री कामाची वेळ संपल्यावर त्यांना ही बस, गाणे शुटींगसाठी देण्यात आली होती. त्याचे भाडेही पीएमपी प्रशासनाला जमा करण्यात आले आहे. तासाला 5 हजार रुपयांचा दर शूटींगसाठी लावण्यात आलेला आहे.
बसमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये
बसला पोस्टर चिकटवू नयेत
बसच्या रचनेत कोणतेही बदल करता येणार नाहीत
बसमध्ये समाजभान असणारेच चित्रीकरण करता येईल
याकरिता पीएमपीचे नियमानुसार भाडे भरावे लागेल
परवानगी घेतल्याशिवाय शुटींग करू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल.
त्या बसमध्ये शूटींग करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. उत्पन्नवाढीसाठी आम्ही हा नवीन पर्याय अमलात आणत आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला पीएमपीच्या बसमध्ये शूटींग करायचे आहे, त्यांनी प्रशासनासी संपर्क करावा. त्यांना नियमानुसार दर आकारणी करून परवानगी दिली जाईल. विना परवानगी बसमध्ये शूटींग करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल.पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल