पीएमपीत अधिकारी टिकेनात! अवघ्या 18 वर्षांत 22 अध्यक्षांच्या नियुक्त्या  Pudhari
पुणे

Pune PMPML News: पीएमपीत अधिकारी टिकेनात! अवघ्या 18 वर्षांत 22 अध्यक्षांच्या नियुक्त्या

सातत्याने होणार्‍या बदल्यांमुळे पीएमपीचा विकास कसा होणार; तज्ज्ञांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पीएमपीमध्ये कार्यकाळ संपायच्या आतच सातत्याने आयएएस दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या होत आहेत. परिणामी, पीएमपीच्या विकासाला मोठी खीळ बसली असून, यामुळे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपीचा विकास कसा होणार? असा सवाल तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.

पदभार घेतल्यानंतर अवघ्या 1 वर्ष 4 दिवसांत पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका दीपा मुधोळ-मुंडे यांची बदली झाली. त्यामुळे पीएमपीचा विकास कसा होणार? असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. (Latest Pune News)

धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी 2017 साली पदभार घेतला, त्यांचीही बदली वर्षाच्या आतच झाली. त्यानंतर नयना गुंडे यांनी पदभार घेतला, त्यांनी तब्बल अडीच वर्षांपर्यंत पीएमपीमध्ये काम केले. यानंतर डॉ. राजेंद्र जगताप यांनी पदभार घेतला, त्यांचीही बदली एका वर्षाच्या आत झाली. त्यांच्याच काळात नव्या ई-बस पीएमपीच्या ताफ्यात यायला सुरुवात झाली होती.

त्यानंतर कुणाल खेमनार यांच्याकडे पीएमपीचा अतिरिक्त कार्यभार आला. तोही फक्त एक महिन्यासाठी होता. यानंतर लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती झाली. त्यांचीही बदली अवघ्या काही महिन्यांतच झाली. त्यांच्यानंतर ओमप्रकाश बकोरिया यांनी पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका या पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांचीही अवघ्या नऊ महिन्यांत अचानकच कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली झाली.

त्यानंतर सचिंद्र प्रताप सिंह नवे अध्यक्ष झाले, चार महिन्यांतच बदली झाली. पीएमपीएमएलची स्थापना झाल्यापासून अवघ्या 18 वर्षांत 22 अध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. परिणामी, पीएमपीचा म्हणावा तसा विकास होऊ शकला नसून, त्यामुळे पीएमपीच्या वर्तुळात नाराजीचे वातावरण आहे. मात्र, सचिंद्र प्रताप सिंह यांच्यानंतर संजय कोलते यांनी पदभार स्वीकारला होता, त्यांचीही बदली एका वर्षाच्या आतच झाली. त्यानंतर दीपा मुधोळ-मुंडे यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतला. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अवघ्या एक वर्ष 4 दिवसांतच त्यांच्या बदलीचे आदेश आले आहेत.

आता पंकज देवरे यांची पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता देवरे हे पीएमपीत किती दिवस काम पाहणार आणि प्रवासीहिताचे काय निर्णय घेणार? याची पुणेकरांना आणि प्रवासीतज्ज्ञांना उत्सुकता लागली आहे.

सात वर्षांत पीएमपीला मिळाले आठ अध्यक्ष

1) नयना गुंडे - फेब्रुवारी 2018 ते जुलै 2020

2) डॉ. राजेंद्र जगताप - जुलै 2020 ते जून 2021

3) डॉ. कुणाल खेमणार -जून 2021 ते जुलै 2021

4) लक्ष्मीनारायण मिश्रा -जुलै 2021 ते ऑक्टोबर 2022

5) ओमप्रकाश बकोरिया -ऑक्टोबर 2022 ते 6 जुलै 2023

6) सचिंद्र प्रताप सिंह - 6 जुलै 2023 ते 23 ऑक्टोबर 2023

7) डॉ. संजय कोलते - ऑक्टोबर 2023 ते जुलै 2024

8) दीपा मुधोळ-मुंडे - 13 जुलै 2024 ते 17 जुलै 2025 (1 वर्ष 4 दिवस कालावधी)

पीएमपी हा भीक मागायचा धंदा आहे. त्याला आर्थिक स्वायत्तता नाही. पीएमपीतील अधिकार्‍याला दोन्ही मनपांना संचलन तूट मागावी लागते. त्यामुळे बरेचसे अधिकारी स्वत:च बदली करून घेतात. कधी-कधी राजकीय दबाव, ठेकेदारांची दादागिरी असते. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली होणे, हे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विकासाला खीळ घालणारे आहे. यामुळे पीएमपीएमएल मागे पडत असून, पीएमपीचा विकास खुंटत आहे. असो, नवीन येणार्‍या अधिकार्‍यास शुभेच्छा...
- संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच
मुंडे मॅडम यांनी पीएमपीत काम करीत असताना कर्मचार्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले. आम्हाला सातवा वेतन आयोग लागू केला. आमच्या बदली हंगामी कर्मचार्‍यांना कायम केले, याशिवाय त्यांनी अनेकांना पदोन्नतीही दिल्या आहेत. दोन्ही महापालिकांकडे जावे लागत असल्याने पीएमपीमध्ये आयएएस दर्जाचा अधिकारी स्वत:च जास्त दिवस राहत नाही, असे चित्र अनेकदा दिसते. मात्र, निर्णय शासनपातळीवर घेतले जातात. मुंडे मॅडम यांना शुभेच्छा आणि नवीन येणार्‍या साहेबांचे आम्ही स्वागत करतो.
- सुनील नलावडे, सरचिटणीस, पीएमपीएमएल राष्ट्रवादी काँग्रेस कामगार संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT